फटाक्यांच्या आतशबाजीत धावली माथेरानची राणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 02:08 AM2019-12-28T02:08:29+5:302019-12-28T02:08:36+5:30
शटल सेवा सुरू : पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण
मुकुंद रांजणे
माथेरान : अतिवृष्टीमुळे काही तांत्रिक कारणास्तव रेल्वे प्रशासनाने मागील सहा महिन्यांपासून बंद करण्यात आलेली अमन लॉज ते माथेरान दरम्यान धावणारी शटल सेवा शुक्रवारपासून सुरू करण्यात आल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे. माथेरान स्थानकातून सकाळी ८.४५ वाजता नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी झेंडा दाखवला, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी श्रीफळ वाढवले, तर मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी इंजीनला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतशबाजी करीत या सेवेचा शुभारंभ के ला.
माथेरानमधील सर्व व्यावसायिक, मोलमजुरी करणारे श्रमिक, दुकानदार, स्टॉल्सधारक, हॉटेल व्यावसायिक, लॉजधारक, स्थानिक अश्वपाल, हातरिक्षाचालक या सर्वांचे उत्पन्नाचे साधन आणि जीवनमान हे केवळ मिनीट्रेनवर अवलंबून असते. सहा महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शटल सेवा सुरू करण्यात आल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तर आपल्या बालगोपाळांना या सेवेचा लाभ मिळणार असल्याने पर्यटकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
या वेळी नगरपरिषद गटनेते प्रसाद सावंत, मुख्याधिकारी रामदास कोकरे, रेल्वेचे डी.आर.एम. शलभ गोयल, ए.डी.आर.एम. आशुतोष गुप्ता, एस.वाय.डी.सी.एम. नरेंद्र पनवार, ए.आर.डी.एन. वाय. पी. सिंग, स्टेशन मास्तर जी. एस. मीना यांसह पर्यटक, नागरिक उपस्थित होते.
खात्री पटल्यानंतरच मिनी ट्रेन सेवा सुरू
पर्यटकांना खरा प्रवास आणि आनंद नेरळ-माथेरान दरम्यानच्या प्रवासाचा घ्यायचा आहे; परंतु सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावर सुरुवातीला मालगाडीची वाहतूक करून हा मार्ग प्रवासासाठी योग्य असेल याची खात्री झाल्यासच नेरळ-माथेरान ही सेवा उपलब्ध होईल असे रेल्वेच्या सूत्रांकडून समजते.
शटलचे वेळापत्रक
अमन लॉज ते माथेरान स्टेशन
सकाळी ८.४०, ९.५५, १०.४५, ११.५५
दुपारी १२.४५, २, ३.५, ३.५५,
शनिवार आणि रविवारी संध्याकाळी ४.४५, ५.३५
माथेरान ते अमन लॉज स्टेशन
सकाळी : ८.१५, ९.३०, १०.२०
दुपारी : १२, १.३५, २.४०, ३.३०,
शनिवार आणि रविवार
संध्याकाळी ४.२० आणि ५.१०
अतिवृष्टीमुळे रूळांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांनी घाटात दिवसरात्र काम केल्याने मिनी ट्रेन पुन्हा सुरू झाली आहे; यामुळे पर्यटन व्यवसायाला गती मिळेल.
-सुनील शिंदे, सामाजिक कार्यकर्ते
आम्ही नियमितपणे या स्थळाला भेट देत आहोत; परंतु मागच्या काळात ही ट्रेन बंद असल्याने आमचा हिरमोड झाला होता. आता पुन्हा ही सेवा खुली करण्यात आल्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला आहे.
- के. एस. नाडकर्णी, पर्यटक, मुंबई
मिनीट्रेन बाबतीत ज्या ज्या वेळी समस्या निर्माण झाल्या होत्या, त्या त्या वेळेस मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सचोटीने प्रयत्न केले आहेत. आम्हीही वेळोवेळी या ट्रेनबाबतीत वरिष्ठांना भेटून निवेदने दिली होती. अन्य पक्षांच्या लोकांनीही आपल्या पद्धतीने पाठपुरावा केलेला आहे. रेल्वे ट्रॅक प्रवासी वाहतुकीकरिता सुरक्षित झाला की, प्रवासी वाहतूक नेरळ-माथेरान सुरू करण्यात येईल, अशी आशा आहे. - प्रसाद सावंत, गटनेते, नगरपरिषद, माथेरान