कल्याण आधारवाडी कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 06:29 PM2017-08-26T18:29:02+5:302017-08-26T18:30:18+5:30
जेलच्या सर्कलमधील ठिकाणी एक खड्डा खोदण्यात आला होता.
कल्याण, दि. 26- ‘साहब, जेल मे सुरंग है’ हा शोले चित्रपटातील डायलॉग सगळ्यांनाच सुपरिचीत आहे. त्याच धर्तीवर आधारवाडी कैद्याने ‘साहब,जेल मे सुराग है’ असे सांगून जेल यंत्रणेची सुरक्षा यंत्रणा किती कमकुवत आहे, याचं उदाहरण देण्याचा प्रयत्न केला आहे. जेलच्या सर्कलमधील ठिकाणी एक खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यात काय आहे हे तपासलं असता त्याठिकाणी एक मोबाईल लपवून ठेवल्याचं उघड झालं. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षा यंत्रणा किती कमकुवत आहे ही बाब पुन्हा एकदा उघडकीस आली आहे, असं बोललं जातं आहे.
आधारवाडी कारागृहात एक पाण्याची टाकी आहे. या टाकीजवळ एक सर्कल आहे. या सर्कल शेजारीच एक खड्डा असल्याचं कारागृहातील कैदी मुरगम हरीजन याला आढळून आलं. त्याने तातडीने ही माहिती कारागृहाचे पाहरेकरी संतोष खारतोडे याला दिली. खारतोडे यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारागृहातील खोदलेल्या खड्डयात काही आहे का हे पाहण्यासाठी माती उकलली. त्याठिकाणी एक प्लॅस्टीक होतं. त्या प्लॅस्टीकच्या खाली मोबाईल मिळाला. सफेद रंगाच्या मोबाईलमध्ये एक बॅटरी होती. तसेच एक सीम कार्डही असल्याचे पाहणीत उघड झाले. या घटनेची तक्रार खारतोडे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळून आलेला मोबाईल जप्त केला आहे. त्यात असलेले सीमकार्ड कोणाच्या नावाने आहे. त्याद्वारे कोणाशी संपर्क साधला आहे. त्याचा कॉल रेकार्ड तपासला जाणार आहे. त्यावरुन त्याचा वापर कोणी कोणासाठी केला हे उघड होणार आहे.