बस पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 01:14 AM2020-02-15T01:14:21+5:302020-02-15T01:14:27+5:30
केडीएमटी : अतिरिक्त जागेसाठी सदस्य घेणार आयुक्तांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमटीच्या गणेशघाट आणि वसंत व्हॅली येथील स्व. बाळासाहेब ठाकरे आगारात ११६ बस धूळखात पडल्या आहेत. परिणामी, चालू स्थितीतील बस ठेवण्यासाठी आगारात जागा नाही. त्यात ६९ बस लिलावात काढण्याचा प्रस्तावही मंगळवारच्या महासभेत फेटाळल्याने अपुऱ्या जागेचा प्रश्न कायम आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने रस्त्यावर बस उभ्या करण्यास वाहतूक शाखा पोलिसांनी मनाई केली आहे. कायदेशीर कारवाईची त्यांनी ताकीद दिल्याने आता खितपत पडलेल्या ६९ बस अन्यत्र उभ्या करण्यासाठी आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती परिवहनचे सभापती मनोज चौधरी यांनी दिली.
परिवहनच्या ताफ्यात सध्या २१६ बस आहेत. नादुरुस्त झालेल्या आणि आयुर्मान ओलांडलेल्या जुन्या बसगाड्यांच्या दुरुस्तीसाठी येणारा वाढीव खर्च पाहता २१६ बसपैकी ७० बस रस्त्यावर धावत आहेत. उर्वरित बस या आगारांमध्ये धूळखात पडल्या असून यात आगारातील जास्तीतजास्त जागा या बसगाड्यांनी व्यापली आहे. यात ४७ भंगार बससह लिलावासाठी प्रस्तावित असलेल्या ६९ बसचाही समावेश आहे.
गणेशघाट आगारातूनच सध्या सर्व बसचे संचालन केले जात आहे. त्यात या आगारातील दोन गुंठे जागेत अमृत योजनेंतर्गत ड्रेनेज प्रकल्पाचे कामही सुरू आहे. परिणामी, संचालन सुरू असलेल्या बस आगारात उभ्या करण्यासाठी जागा नाही. हीच अवस्था वसंत व्हॅली येथील आगाराची आहे, तर डोंबिवलीतील खंबाळपाडा आगारात कचरागाड्या उभ्या केल्या जात आहेत. दुसरीकडे वाहक व चालकांची कमतरता आणि उत्पन्न आणि खर्चातील वाढती तफावत पाहता ६९ बसगाड्यांचा लिलाव करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला होता. परंतु, संबंधित प्रस्ताव महासभेने फेटाळला आहे. यावेळी झालेल्या चर्चेत काही नगरसेवकांनी बस दुरुस्त करून चालवाव्यात, अशी मागणी केली आहे.
यासाठी नगरसेवक निधीही देण्याची तयारी दर्शविली आहे. नगरसेवक निधी उपलब्ध होऊन बसदुरुस्ती होऊन त्या रस्त्यावर धावेपर्यंत आगारातच धूळखात पडणार आहेत. परंतु, सध्या आगारात जागाच न उरल्याने चालू स्थितीतील बस आगाराच्या बाहेर रस्त्यावर उभ्या कराव्या लागत आहेत. वाहतूक पोलिसांनी बस रस्त्यावर उभ्या करण्यास विरोध दर्शवल्याने आता आगारात धूळखात पडलेल्या बस अन्यत्र ठिकाणी ठेवण्यासाठी जागेची मागणी केली जाणार आहे. त्याशिवाय, अन्य पर्याय नसल्याचे सभापती चौधरी यांनी सांगितले.