धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 11:45 PM2020-09-21T23:45:39+5:302020-09-21T23:46:44+5:30
४३ इमारती तोडण्याची कारवाई मनपा प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार होती; मात्र याकडेही दुर्लक्ष झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : धामणकरनाका परिसरातील इमारत दुर्घटनेनंतर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या कारभारामुळे शहरातील धोकादायक इमारतींची संख्या वाढत असून सद्य:स्थितीत ७८२ धोकादायक इमारती मनपा हद्दीत असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. यामध्ये २१0 इमारती अतिधोकादायक आहेत.
यातील ४३ इमारती तोडण्याची कारवाई मनपा प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार होती; मात्र याकडेही दुर्लक्ष झाले आहे. या भीषण इमारत दुर्घटनेनंतर आता तरी मनपा प्रशासन धोकादायक इमारतींबाबत धोरण निश्चित करेल का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. शहरातील धोकादायक इमारतींमध्ये सुमारे २५ हजार कुटुंबे राहत असून सुमारे एक लाख नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
तीन वर्षांपूर्वी भिवंडीत विविध ठिकाणी झालेल्या इमारत दुर्घटनांमध्ये १९ जणांचा मृत्यू, तर ४२ जण जखमी झाले होते. त्यावेळी शासनाने दखल घेऊन अनधिकृत, धोकादायक इमारती तोडून टाकण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, पालिका प्रशासनाने फक्त कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानल्याने पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महानगरपालिकेच्या एकूण पाच प्रभाग समित्या असून प्रभाग समिती क्र. १ मध्ये १६, प्रभाग समिती क्र. २ मध्ये १५९, प्रभाग समिती क्र. ३ मध्ये १0८, प्रभाग समिती क्र. ४ मध्ये २७८, प्रभाग समिती क्र. ५ मध्ये २२१ अशा एकूण ७८२ धोकादायक इमारती आहेत. या इमारतींमध्ये हजारो नागरिक राहत असून त्यांच्या जीवाला धोका असल्याची प्रचीती या दुर्घटनेतून आली आहे.
782
इमारती
धोकादायक
210
इमारती
अतिधोकादायक