अजय आठवालच्या कन्येचा आर्त सवाल... आई, बाबा सापडला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 03:54 AM2017-09-28T03:54:11+5:302017-09-28T03:54:30+5:30

अजय झिलेसिंग आठवाल हा सफाई कामगार २९ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या दिवशी आपल्या दोन मुलींना वाचवताना बुडून मरण पावला त्याला आता महिना होत आला. मात्र अजयचा मृतदेह सापडला नाही.

The question of the daughter of Ajay Athavale ... Mother, did you find me? | अजय आठवालच्या कन्येचा आर्त सवाल... आई, बाबा सापडला का?

अजय आठवालच्या कन्येचा आर्त सवाल... आई, बाबा सापडला का?

Next

- पंकज रोडेकर ।

ठाणे : अजय झिलेसिंग आठवाल हा सफाई कामगार २९ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या ुदिवशी आपल्या दोन मुलींना वाचवताना बुडून मरण पावला त्याला आता महिना होत आला. मात्र अजयचा मृतदेह सापडला नाही. अखेर त्याच्या कुटुंबीयांनीच त्याची शोध मोहीम सुरु केली आहे. बुधवारी तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतरही अजयचा थांगपत्ता लागला नाही. अजयची गरोदर पत्नी आणि तीन लागोपाठच्या मुली तळपत्या उन्हात आशेने वाट पाहत किनाºयावर उभ्या होत्या.
निरोपाचा पाऊस २९ तारखेला अजयकरिता काळ बनून आला. रामवाडी, रामनगरला राहणारा अजय त्या जलप्रलयातून आपल्या दोन चिमुरड्या पोरींना वाचवत असताना पाण्याच्या दुथडी भरुन वाहणाºया प्रवाहात वाहून गेला. मृत्यूचे तांडव करणाºया पावसाने अखेर मान टाकली. नाले-खाडीतील उसळत वाहणारा पाण्याचा उर्मट प्रवाह हळूहळू मार्दवला. मात्र ना अजय परत आला ना त्याचा काही ठावठिकाणा लागला. समुद्र, खाडी पोटात काहीच ठेवत नाही. एखादा जीव तिनं गिळला तर फुगलेल्या प्रेताचा लगदा कुठल्या ना कुठल्या किनाºयावर लागतोच. त्याचा दुर्गंध आजूबाजूने जाणाºयांच्या नागपुड्या जाळून कलेवराची दवंडी पिटतो. अजय कुठे गेला? त्याला खाडीने आपल्या उदरात घेतला की काय? एक-दोन दिवस अजयचा मृतदेह शोधला गेला मात्र त्यानंतर सारी मोहीम थंड झाली. तीन रडवेल्या पोरी आणि पोटात हालचाल करणारा पोरका जीव घेऊन अजयची पत्नी अश्रू ढाळत बसली. घरची परिस्थिती बेताची. मृतदेह न सापडल्याने शासनाकडून आर्थिक मदतीची आशा नाही. अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्याचीही शक्यता नाही. संसार कसा चालवायचा, पोरींना कसं वाढवायचं, या व अशा असंख्य व्यावहारिक प्रश्नांची रास मागं सोडून गेलेल्या अजयला शोधण्याचा निर्धार त्याचा भाऊ दशरथ आठवाल तसेच मित्रमंडळींनी घेतला.
अजय ज्या ठिकाणाहून वाहून गेला, त्या ठिकाणापासून शोधमोहीम सुरू झाली. या मोहिमेसाठी आठवाल या कुटुंबीयांना ठाण्याच्या खाडीत बुडणाºया साडेतीन हजार लोकांचे जीव वाचविणारे जीवनरक्षक राजेश खारकर आणि भारिपचे शहराध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी मदत केली आहे. खारकर यांच्या पथकाबरोबर आठवाल कुटुंबीय आणि नातेवाईक, मित्र परिवार असे २० ते २५ सहभागी झाले. या शोध मोहिमेची माहिती पोलीस आणि महापालिका प्रशासनास दिल्याने पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचारीही उपस्थित होते. एखाद्या व्यक्तीच्या शोधाकरिता त्याच्या नातलगांनी स्वत: शोध मोहीम हाती घेण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे पालिकेनेही मान्य केले.
रामवाडी, बुश कंपनी, ब्रॅडमा कंपनी, रघुनाथ नगर, रेल्वे नाला यामधील चिखल तुडवत, एखाद्या ठिकाणी काही फुगीर वस्तू आढळल्यास तिला काठी ढोसून पाहत, कुठे फावड्याने चिखल उपसून पाहत ३६ जणांनी कोपरी खाडी परिसरातही ६ तास अजयचा शोध घेतला. सकाळपासून सुरू झालेली मोहीम सायंकाळी अंधारु लागले आणि काळोख नाल्यातील गडद चिखलात उतरल्याने थांबवण्यात आली. अजयचा शोध घेऊनच ही मोहीम थांबणार असल्याने पुढेही सुरु राहणार आहे. अजयच्या पत्नीच्या पदराला धरुन उभ्या असलेल्या चिमुरडीने आईला विचारले की, बाबा सापडला का? आईचे पतीकडे लागलेले डोळे झरत असल्याचे त्या चिमुरडीला काळोखामुळे दिसलेच नाही. तिने पुन्हा प्रश्न केला आई, बाबा सापडला का...

‘‘ सुरूवातीला महापालिका प्रशासनाने सहकार्य केले. मात्र, त्याचा शोध वरवर घेतला. अजय याच्या पश्चात तीन मुली आणि गरोदर पत्नी असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मदत करावी. ’’
- दशरथ आठवाल, अजयचा भाऊ

‘‘ पालिका प्रशासनाकडे मृतदेह शोधण्यासाठी स्कॅनिंग मशीन तसेच नाल्यात चालणाºया बोटी नाहीत. त्यामुळे ठाणेकर नागरिकांचाही जीव अजय प्रमाणेच धोक्यात आहे. महापालिका प्रशासनाच्या चुकीमुळेच, नालेसफाई न झाल्याने तसेच नाले रुंद न केल्याने अजयचा जीव गेला आहे. त्याच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी त्याच्या पत्नीला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी.’’
- राजाभाऊ चव्हाण,
भारिपचे शहराध्यक्ष

‘‘बेपत्ता झालेल्या अजयचा महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुचनांनुसार सर्वोतोपरी शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.’’
- संतोष कदम, आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख, ठामपा

Web Title: The question of the daughter of Ajay Athavale ... Mother, did you find me?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.