फेरीवाल्यांचा प्रश्न अधांतरीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:52 AM2018-05-03T01:52:57+5:302018-05-03T01:52:57+5:30
केडीएमसी हद्दीतील फेरीवाल्यांचा प्रश्न हा नेहमीच चर्चिला जातो.
कल्याण : केडीएमसी हद्दीतील फेरीवाल्यांचा प्रश्न हा नेहमीच चर्चिला जातो. परंतु, यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा निघण्याची चिन्हे नाहीत. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू यांच्या कार्यकाळात मार्चमध्येही बैठक रद्द झाली होती. त्यानंतर, गुरुवार होणारी नगर पथविक्रेता समितीची बैठक अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली. ही बैठक पुढे ढकलली असली, तरी सलग दोन बैठका रद्द झाल्याने फेरीवाला संघर्ष समितीने नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाला फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचे सोयरसुतक नसल्याने बैठका वारंवार रद्द केल्या जात असल्याचा त्यांचाआरोप आहे.
फेरीवाल्यांंचे पुनर्वसन करण्यासाठी केडीएमसीने आजवर कोणतीही ठोस कृती केलेली नाही. केडीएमसीने स्थापन केलेली शहर फेरीवाला समिती ही नगर पथविके्रता समिती म्हणून पुनर्जीवित केली आहे. या समितीचे अध्यक्ष आयुक्त हे स्वत: आहेत. या समितीत प्रमुख अधिकारी आणि फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही आहेत.
फेरीवाला धोरणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मार्चमध्ये वेलरासू यांनी बैठक बोलावली होती. परंतु, त्यांना कामासाठी मंत्रालयात जावे लागल्याने बैठक रद्द झाल्याचे आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यावेळी पुढील तारीखही कळवलेली नव्हती. याबाबत, फेरीवाला प्रतिनिधींनी तेव्हाही नाराजी व्यक्त केली होती. प्रशासनाला फेरीवालाप्रश्नी कोणतेही गांभीर्य नसल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता.
दरम्यान, गुरुवारी पुन्हा नगरपथविक्रेता समितीची बैठक आयुक्त गोविंद बोडके यांनी बोलावली होती. आयुक्तांच्या दालनात सकाळी ११ वाजता ही बैठक होणार होती. परंतु, नगरपथ समितीच्या सदस्यांना पत्र पाठवून ही बैठक रद्द केल्याचे बुधवारी सांगण्यात आले. काही अपरिहार्य कारणांमुळे बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. पुढील बैठक १५ मे ला दुपारी ३.३० ला होणार आहे.