स्वच्छतेचे प्रश्नांकित दर्पण - लोकसहभागातून ‘स्वच्छता दर्पण’मध्ये राज्यात प्रथम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:59 AM2019-06-09T00:59:15+5:302019-06-09T00:59:30+5:30
केंद्र सरकारच्या पेयजल स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छतेच्या कामांकरिता ‘स्वच्छता दर्पण’ या मूल्यांकनात ठाणे जिल्हा राज्यात प्रथम, तर देशात १२५ व्या क्रमांकावर आहे.
‘ठाणे जिल्हा हा २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार २३ मार्च २०१७ रोजी हगणदारीमुक्त घोषित करण्यात आला. या पायाभूत सर्वेक्षणामधून सुटलेल्या आणि शौचालय नसलेल्या कुटुंबांची संख्या (लॉब) चार हजार ३०२ होती. त्यापैकी तीन हजार ७०९ कुटुंबांना शौचालये बांधून पूर्ण करून देण्यात आली. त्याचे फोटो केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर पाठवण्यात आले.
जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या असून टप्पा-२ च्या पडताळणी प्रक्रियेत सर्व ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत. नादुरुस्त शौचालयांची संख्या तीन हजार ८९ आहे. त्यांची सर्व कामे पूर्ण करून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंद केली आहे. ४३० ग्रामपंचायतींमधील ७७६ गावांच्या स्वच्छता इंडेक्सची माहिती आॅनलाइन करून घेण्यात आली आहे. जिल्ह्यात ८२२ स्वच्छताग्राहींची केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंद करण्यात आलेली आहे.
हगणदारीमुक्त ग्रामपंचायतींमध्ये शाश्वतता टिकवून ठेवण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छताग्राही, जलसुरक्षक, शिपाई यांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. ग्रामीण भागात १५० ग्रामपंचायतींमध्ये कला पथकाच्या माध्यमातून जाणीव-जागृती केली आहे. शंभर ग्रामपंचायतींमध्ये एलईडीद्वारे जागृती केली, तर एसटी महामंडळाच्या १६५ बसगाड्यांवर जाहिरातींद्वारे जागृती केली. ग्रामपंचायतस्तरावर सात हजार ५०० दिनदर्शिकांचे वाटप केले. गावखेड्यांमधील ५० हजार शौचालयांवर स्वच्छतेशी निगडित स्टीकर व १० हजार शोषखड्ड्यांचे स्टीकर लावले. स्वच्छता व शौचालयवापराची शाश्वतता टिकवून ठेवण्यासाठी ५३ जिल्हा परिषद गटांमध्ये स्वच्छतेचे मेळावे घेतले. महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी महिला मेळाव्यांवर भर दिला. मासिकपाळी व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा कार्यकर्ता आदींद्वारे प्रशिक्षण कार्यक्रम राबवला. ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी सर्व ग्रामसेवक, सरपंच यांच्या कार्यशाळा घेऊन शाश्वत स्वच्छतेचे १५५ आराखडे तयार करून घेतले. उर्वरित कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाचे १३४ बृहद्आराखडे तयार करण्यात आले आहेत व काही कामे प्रगतीपथावर आहेत. लोकसहभाग मोठ्या प्रमाणात मिळवून स्वच्छतेशी संबंधित उपक्रम राबवल्यामुळे ठाणे जिल्हा ‘स्वच्छता दर्पण’मध्ये राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करू शकला.
(मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे)
- शब्दांकन : सुरेश लोखंडे
केंद्र सरकारच्या पेयजल स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छतेच्या कामांकरिता ‘स्वच्छता दर्पण’ या मूल्यांकनात ठाणे जिल्हा राज्यात प्रथम, तर देशात १२५ व्या क्रमांकावर आहे. या यशस्वितेकरिता ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) अंतर्गत
२०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने काम केले. दोन वर्षांपूर्वी पायाभूत सर्वेक्षणानुसार ठाणे जिल्हा हगणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित झाला. त्यानंतर, जिल्ह्यात स्वच्छता टिकून राहावी, यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन जिल्ह्याचा ग्रामीण भाग ‘स्वच्छ-सुंदर’ राहावा, याकरिता सातत्याने प्रयत्न केले.