सिमेंट रस्त्यातील खड्ड्यांवर प्रश्नचिन्हे; उल्हासनगरात रस्त्यातील खड्डे भरण्याला सुरवात
By सदानंद नाईक | Published: August 2, 2023 09:03 PM2023-08-02T21:03:20+5:302023-08-02T21:03:43+5:30
शहरात पावसाने काही प्रमाणात उसंत घेताच रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशाने सुरू झाले.
उल्हासनगर: शहरात पावसाने काही प्रमाणात उसंत घेताच रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशाने सुरू झाले. मात्र काही महिने व वर्षांपूर्वी महापालिकेने बांधलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावरील खड्ड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
उल्हासनगरातील पवई चौक ते विठ्ठलवाडी स्टेशन, हिराघाट ते महापालिका रस्ता, व्हिटीसी ग्राऊंड ते मोर्यानगरी रस्ता, नेताजी गार्डन ते तहसील रस्ता, व्हीनस चौक ते एसएसती कॉलेज रस्ता, खेमानी परिसरातील रस्ते यासह बहुसंख्य रस्ते खड्डेमय झाले आहेत. छत्रपती शाहू महाताज उड्डाण पुलावरील खड्डे एका आठवड्यापूर्वी भरूनही खड्डे जैसे थे झाले आहे. मंगळवारी पावसाने उसंत दिल्यावर श्रीराम चौक ते पेन्सिल कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यासह अनेक रस्त्यातील खड्डे महापालिका बांधकाम विभागाने भरले आहे. मात्र त्यानंतर आलेल्या पावसाने, पुन्हा खड्डे जैसे थे झाले आहेत. मराठा सेक्शन येथील सिमेंटन काँक्रीट रस्ता बांधल्यानंतर रस्त्या शेजारील नालीचे काम सुरू केले. मात्र चांगल्या रस्त्याची खड्ड्याने चाळण झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून पुन्हा सिमेंट काँक्रीट रस्त्याची नव्याने बांधणी महापालिका करणार का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी केला आहे.
कॅम्प नं-४, हॉली फॅमिली शाळे समोरील रस्ता व शेजारील सार्वजनिक मंडळाकडे जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याला ४ महिन्यात भेगा पडल्याने, निकृष्ठ रस्त्याची बांधणी पुन्हा करण्याची मागणी होऊन ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे. हॉली फॅमिली व सार्वजनिक मंडळाकडे जाणारार रस्ता तसेच सी ब्लॉक गुरुद्वार ते कलानी कॉलेजकडे जाणाऱ्या रस्स्त्याची चौकशी करून कारवाई करण्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली आहे. तसेच पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर खड्डे भरण्याचे काम हाती घेणार असल्याचे माहिती जाधव यांनी दिली आहे.