उपमहापौर भगवान भालेराव यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; उल्हासनगर रिपाइंत उभी फूट? भाजपसोबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 03:57 PM2020-12-14T15:57:45+5:302020-12-14T15:57:53+5:30
उल्हासनगर महापालिकेत रिपाइं आठवले गट भाजप ऐवजी शिवसेना महाआघाडी सोबत आहेत.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : देशासह राज्यात रिपाइं आठवले गटाची भाजपा सोबत आघाडी असताना उल्हासनगर महापालिकेत पक्षाचे शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव हे शिवसेना महाआघाडीत आहेत. दोन दिवसांपूर्वी पक्षाचे इतर पदाधिकाऱ्यांनी थेट भाजपा सोबत आगामी महापालिका निवडणुकी बाबत चर्चा केल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर येऊन पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उल्हासनगर महापालिकेत रिपाइं आठवले गट भाजप ऐवजी शिवसेना महाआघाडी सोबत आहेत. दरम्यान महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतांना, भाजपातील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेच्या लिलाबाई अशान व रिपाइंचे भगवान भालेराव याना मतदान केल्याने ते महापौर, उपमहापौर पदी निवडून आले. तसेच स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेने भाजपाचे बंडखोर समिती सदस्य विजय पाटील यांना सूचक अनुमोदक दिले. तर एका भाजप सदस्यांने समिती सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने, पाटील स्थायी समिती सभापती पदी निवडून आले. शिवसेना महाआघाडीत रिपाइं असतांना, पक्षातील अनेकांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सोबत चर्चा केल्याने, रिपाइंतील वाद चव्हाट्यावर आला.
भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, पक्षाचे प्रवक्ता मनोज लासी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी आदींनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर रिपाइंचे प्रदेश सचिव नाना पवार, माजी अध्यक्ष राजू सोनावणे, माजी नगरसेवक शांताराम निकम, पक्षाचे नेते अरुण कांबळे, महेंद्र बच्छाव, गौरव धावरे, तुकाराम सोनावणे आदी पक्षाच्या पदाधिकारी सोबत चर्चा केली. पक्षाची राज्य व शहर कार्यकारणी पक्षाचे राष्ट्रीय नेते व अध्यक्ष रामदास आठवले यांनी बरखास्त केल्याने, या चर्चेत दम नसल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली. तर पक्षाचे नेते व माजी नगरसेवक शांताराम निकम यांनी पक्षाची भाजप सोबत आघाडी असून शहर त्याला अपवाद नाही. असी प्रतिक्रिया दिली. शहर व पदाधिकारी कार्यकारणी बरखास्त केली असेलतर भालेराव शहराचे अध्यक्ष कसे काय? अशी प्रतिक्रिया दिली.
रिपाईची शक्ती विखुरलेली?
शहर आंबेडकर आंदोलनाचे केंद्र असून रिपाईची शक्ती मोठी आहे. मात्र रिपाईची शक्ती अनेक गटातटात विखुरली असून आठवले गटाची ताकद शहरात आहे. तसेच पक्षाचे ३ नगरसेवक महापालिकेत असून पक्षाकडे भगवान भालेराव यांच्याकडे उपमहापौर पद आहे. भगवान भालेराव यांच्या एकले रे चलोच्या भूमिकेमुळे पक्षातील दुखावलेले पक्ष पदाधिकाऱ्यांनी भाजप सोबत आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आघाडीची सोबत केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.