उल्हासनगर महापालिका आरोग्य सुविधेवर प्रश्नचिन्ह; साई प्लॅटीनियम रुग्णालयाने केले १८ लाख परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 06:44 PM2020-07-17T18:44:38+5:302020-07-17T18:44:45+5:30
साई प्लॅटीनियम कोविड रुग्णालयात कोरोना रुग्णावर उपचार होण्यासाठी महापालिकेने १८ लाखाचे ऑक्सीजन साहित्य पुरविण्यात आले
उल्हासनगर : पालकमंत्र्यांच्या हस्ते दणक्यात उद्घाटन झालेल्या साई प्लॅटीनियम कोविड रुग्णालयाने सुविधा पुरविलेल्या साहित्याचे १८ लाख रुपये महापालिकेला परत केले. याप्रकाराने शहर आरोग्य सुविधेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले असुन रुग्णालय पूर्वी प्रमाणे आरोग्य सुविधा देणार असल्याची प्रतिक्रिया महापौर लीलाबाई अशान यांनी दिली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरातील साई प्लॅटीनियम कोविड रुग्णालयात कोरोना रुग्णावर उपचार होण्यासाठी महापालिकेने १८ लाखाचे ऑक्सीजन साहित्य पुरविण्यात आले. तसेच रुग्णालयाच्या उभारणी पासून पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी लक्ष ठेवून पाहणी दौरा केला. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले असून रुग्णावर महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार होणार असल्याचे सांगितले.
उद्घाटन वेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर, महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, तत्कालीन महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, विरोधी पक्षनेते किशोर वणवारी, सभागृह नेते राजेंद्र चौ धरी यांच्यासह विविध पक्षाचे स्थानिक नेते उपस्थित होते. शहरातील कोरोना रूग्णांना मोफत उपचार मिळणार अशी शक्यता असताना रुग्णालय पहिल्या दिवसापासून वादात सापडले. मनसेसह भाजपच्या नेत्यांनी रुग्णालयाच्या प्रशासना बाबत नाराजी व्यक्त केली.
महापालिका स्थायी समिती सभेत साई प्लॅटीनियम रूग्णालयातील सुविधांवर खर्च केलेल्या १८ लाख रुपये देण्याला मान्यता दिली. दरम्यान गुरवारी सायंकाळी साडे पाच वाजता महापौर लीलाबाई अशान व आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी साई प्लॅटीनियम रुग्णालय प्रशासनाने पालिकेने रुग्णालयाच्या सुविधेत खर्च केलेल्या १८ लाखाचा चेक दिला. तसेच शासन नियमानुसार रुग्णालयात कोरोना रुग्णावर उपचार होणार असल्याचे सांगितले. या प्रकाराने शिवसेना कोंडीत सापडली असून महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
शासन नियमानुसार होणार उपचार-
महापालिकेचे तत्कालीन आयुक्तांनी कोरोना रूग्णाच्या उपचारासाठी शासन नियमानुसार खाजगी रुग्णालय ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. यातूनच साई प्लॅटीनियम रुग्णालयाचा पर्याय पुढे येवून सूविधे वर पालिकेने खर्च केला. १८ लाख परत केल्यावरही रुग्णालयात शासन नियमानुसार उपचार होणार आहे. - महापौर अशान
शिवसेना कोंडीत सापडली-
साई प्लॅटीनियम रुग्णालय प्रकरणी शिवसेना कोंडीत सापडली असून महापालिका आयुक्तांची भूमिका बाबत शहरात संभ्रम निर्माण झाला. एकूणच या प्रकरणी चौकशी झाल्यास अनेक मोठ्या माश्यांची नावे उघड होणार आहे. मात्र कोरोना रुग्णाची आर्थिक पिळवणूक होणार आहे. - बंडू देशमुख