प्रश्नपत्रिका व्हॉटसअॅपवर व्हायरल झाल्याने शाळेची मान्यता रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 04:28 AM2018-08-28T04:28:53+5:302018-08-28T04:29:26+5:30
किडीज् पॅराडाईज : शाळेतील विद्यार्थ्यांना इतरत्र सामावून घेणार
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान यंदाही प्रश्नपत्रिका व्हॉटसअॅपवर व्हायरल झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात मुंब्रा येथील किडीज् पॅराडाईज इंग्लिश शाळेवर अखेर ठपका ठेवण्यात आला असून शाळेची मान्यता रद्द करण्याची घोषणा सोमवारी राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाने केली. ही कारवाई करताना शाळेत असलेल्या इतर विद्यार्थ्यांना इतरत्र समावून घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या बोर्डाच्या परीक्षेदरम्यान परीक्षा सुरू होण्याच्या काही मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका व्हॉटसअॅपवर व्हायरल झाल्याचे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या वेळी पोलिसांनी केलेल्या तपासाअंती मुंब्रा येथील किडीज् पॅराडाईज इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजवर ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बोर्डातर्फे समिती स्थापन करण्यात आली होती. अखेर या समितीने दिलेल्या अहवालानुसार ही शाळा दोषी आढळून आली असून शाळेवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. या शिफारशीनुसार किडीज् पॅराडाईज इंग्लिश हायस्कूलची मान्यता शैक्षणिक वर्ष २०१८-१९पासून काढून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी हा निर्णय जाहीर केला असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. याबाबत शिक्षण उपसंचालकांना लवकर कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
कारवाई नियमानुसार
च्डॉ. बोरसे म्हणाले, बोर्डाने नियमानुसार कारवाई केली आहे. ही कारवाई करताना त्या शाळा आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थ्यांची व्यवस्था नजीकच्या शाळा आणि महाविद्यालयांत करण्याची सूचना केली आहे.