बेरोजगारांचे प्रश्न साहित्यात उमटावेत- फादर फ्रान्सिस दिब्रेटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 01:11 AM2019-11-13T01:11:13+5:302019-11-13T01:11:17+5:30
देशापुढे आर्थिक पातळीवरचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचा प्रश्न आहे.
ठाणे : देशापुढे आर्थिक पातळीवरचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचा प्रश्न आहे. अनेक उद्योगधंद्यांना टाळे लागत आहे. एकेका कार्यालयातील शेकडो कर्मचारी बेकार होणार आहेत, त्यांच्या घरातील चुली पेटणार नाहीत या प्रश्नांचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे, असे मत संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी ठाण्यात व्यक्त केले.
अ. भा. मराठी साहित्य परिषद, पुणे, ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने मंगळवारी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांचा जाहीर सत्कार मराठी ग्रंथ संग्रहालय येथे करण्यात आला. ते पुढे म्हणाले, आज जर कविता लिहायची असेल तर ती शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन लिहीली पाहिजे. त्यांचे पिकवलेले सगळेच वाहून गेले आहे. त्यांच्या डोळ््यांतील अश्रू वाचता आले पाहिजे हे सांगताना ते म्हणाले की, एकांत, चिंतन केल्याशिवाय, तिºहाईकाच्या नजरेने पाहिल्याशिवाय, दीपस्तंभ होऊन गेलेल्या व्यक्तींच्या साहित्याचे वाचन केल्याशिवाय कविता होत नाही. अशा प्रकारचे साहित्य हे टिकून राहते. शेक्सपिअर कधीच जुना झाला नाही. त्याने वास्तवावर कधी दुर्लक्ष केले नाही. त्याकाळी त्याने जे लिहीले ते वास्तव होते असे ते म्हणाले.
अशोक बागवे म्हणाले की, स्वत:ला स्वत:चा आरसा म्हणून पाहणे म्हणजे कवितेची निर्मिती होय. तुमची कविता तुम्ही स्वत: लिहीली असेल तर ती मोबाईल घेऊन का
वाचता अशी टीका करून ते म्हणाले, शब्दांनासुद्धा हृदयाच्या रक्तापर्यंत जाण्याची सवय असली पाहिजे.
कवी आकृती निर्माण करतो पण कृती का करत नाही असा प्रश्न उपस्थित करत आता कृतीची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. कवींनी आपल्यानंतर येणाºया कवींना जपले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या ‘खिल्ली’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिबे्रटो यांच्या हस्ते झाले.
यावेळी कवी शरद गोरे आणि ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे, विजया माणगावकर, कार्यवाह परशुराम नेहेरे आदी उपस्थित होते. मीना पगारे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
।राजकारणावर कोपरखळी
महाराष्ट्राच्या लोकशाहीला हसावं की ठोकशाहीला हसावं कळत नाही अशी टिपणी करताना ज्येष्ठ कवी अशोक बागवे म्हणाले की, साहित्यिक हा एकनिष्ठ असतो. तो दलबदलू किंवा पक्षबदलू नसतो अशी कोपरखळीही त्यांनी मारली.