इंदिरा गांधी चौकात पहाटेपासून रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 12:07 AM2020-06-09T00:07:10+5:302020-06-09T00:07:18+5:30
कर्मचारी त्रस्त : बस प्रवासातही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला तिलांजली
डोंबिवली : नियोजनाअभावी शहरातील कर्मचाऱ्यांचे न भूतो न भविष्यती असे हाल झाले. पूर्वेकडील इंदिरा गांधी चौकामध्ये पहाटेपासून चाकरमान्यांनी रांग लावली होती. अवघ्या तासाभरात ती रांग दोन किमीपर्यंत लांब फडके पथावर पोहोचली. आणखी लांब रांग लागण्यापेक्षा चाकरमान्यांनी दोन रांगा केल्याने गोंधळात भर पडली. परंतु, एसटीसह अन्य यंत्रणांच्या बस यायला विलंब झाल्याने चाकरमान्यांना किमान दोन ते अडीच तास रांगेत उभे रहावे लागल्याने त्यांचे हाल झाले.
बसमध्ये प्रवेश करण्यासाठी चाकरमान्यांनी बसच्या प्रवेशद्वारावर एकच गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. बस मिळाल्यानंतर मुंबईत सीएसटी येथे कार्यालय गाठायला आणखी तीन तास लागत असल्याने प्रत्येक डोंबिवलीकर बसच्या रांगेत उभा राहिल्यापासून कार्यालयात पोहोचायला किमान पाच तास लागत होते. शिवाय अडीच महिन्यांच्या ‘सक्तीच्या रजेनंतर’ लेटमार्क झाल्यामुळे ‘साहेबा’चे बोल ऐकावे लागले ते वेगळेच. मुंबईला जायला आम्ही तयार आहोत, पण राज्य शासन वाहतुकीची सुविधा उपलब्ध करणार आहे का? रेल्वेसेवा बंद आणि वाहनांची व्यवस्था नाही, कामावार जायचे तरी कसे, असा उद्विग्न सवाल चाकरमान्यांनी केला.
मुंबईला जाण्यासाठी दररोज तीन ते पाच मिनिटांच्या अंतराने लोकल धावत असतानाही त्याला लटकून जाणाºया डोंबिवलीकरांसाठी एसटीने विविध ठिकाणी १२५ बस सोडल्या. त्यात मंत्रालयासाठी ३५, मुंबई व परळसाठी प्रत्येकी दोन, ठाणे ५८, तर, कल्याण मार्गावर २८ बसफेऱ्यांचा समावेश होता. या बसमधून खरेतर नियोजनानुसार एका सीटवर एक प्रवासी प्रवास करणे अपेक्षित होते. मात्र, ताटकळलेल्या प्रवाशांचे करुण चेहरे आणि हतलब बस वाहक यांनी नियोजनाला केराची टोपली दाखवली. आम्हाला कोरोना झाला तरी चालेल पण बसमध्ये शेजारीशेजारी बसू द्या, अशी निर्वाणीची भाषा करीत वैतागलेल्या प्रवाशांनी बसमध्ये प्रवेश करून जागा पटकावल्या.
इंदिरा गांधी चौकात रिक्षा, दुचाकी, खासगी बस, परिवहनच्या बस यामुळे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत तुफान कोंडी झाली होती. त्यामुळे अनेक बस वळण घेऊन मुंबईकडे जातानाच अडकल्या. अखेरीस इंदिरा गांधी चौकातून वाहने वळवून फतेह अली रस्त्यामार्गे फडके पथ, बाजीप्रभू चौकातून पुन्हा इंदिरा गांधी चौकात आणण्यात आली. केडीएमसीच्या डोंबिवली कार्यालयानजीक हा गोंधळ सुरू होता, परंतु मनपाचे कोणतेही अधिकारी, कर्मचारी तेथे रांगेतील कर्मचाºयांना फिजिकल डिस्टन्स पाळा, असे सांगण्यासाठी अथवा अन्य नियोजनासाठी पुढे आले नाहीत. वाहतूक व स्थानिक पोलिसांचाही अभाव दिसून आला. परतीच्या प्रवासासाठी असेच हाल सोसून पहाटे ५.३० वाजता घर सोडलेले डोंबिवलीकर रात्री ९ वाजता घरी परतले. बस न मिळाल्याने सरकारच्या नावे खडे फोडत काहींनी घर गाठले.
अत्यावश्यक सेवा म्हणून आम्हाला कामावर बोलावले आहे. पण तेथे जायचे कसे, याचे नियोजन नाही. दोन तास झाले आम्ही इंदिरा चौकात रांगेत उभे आहोत. कामावर गेलो नाही की वरिष्ठ राग करतात. या सगळ्या गोंधळात आमच्या नोकºया गेल्या तर राज्य शासन जबाबदार असेल.
- विलास खंडागळे, डोंबिवली
एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी इंदिरा चौकात जमणार आहेत, याबाबत आम्हाला काहीही पूर्वसूचना नव्हती. एसटी, खासगी बस किती येणार, कुठून येणार याबाबतही माहिती दिलेली नाही. त्यामुळे आमची यंत्रणा नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊनंतर कार्यरत झाली.
- सतेज जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, डोंबिवली
इंदिरा चौकात चाकरमान्यांनी गर्दी केली. परंतु, त्या तुलनेने बसची संख्या अतिशय तोकडी होती. गर्दीमुळे गोंधळ झाल्याने एसटीच्या नियंत्रण कार्यालयातून सकाळी साडेआठ वाजता पोलीस यंत्रणेला कळवण्यात आले. त्यानंतर तातडीने आम्ही कर्मचारी पाठवले. पण तोपर्यंत लांबवर रांगा लागलेल्या होत्या. मंगळवारी पहाटेपासूनच पोलीस यंत्रणा तैनात ठेवू.
- सुरेश अहेर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामनगर पोलीस ठाणे, डोंबिवली
रेल्वेसेवा बंद असल्याने बससाठी नागरिक मोठ्या संख्येने येणार, हे अपेक्षित होतेच. मुंबईला जाणाºयांची प्रचंड संख्या असल्याने बसगाड्यांची संख्या भरपूर हवी. यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा करून जेवढे सहकार्य संबंधित यंत्रणांना करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करू
- राजेश सावंत, ‘फ’ प्रभागक्षेत्र अधिकारी, केडीएमसी
‘रेल्वेमन’ ट्रेनमध्ये कंत्राटी कर्मचारी : डोंबिवली : रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे कर्मचाºयांसाठी कर्जत येथून सोडण्यात येणाºया विशेष ट्रेनमध्ये सोमवारी कल्याण येथे विविध स्थानकांत साफसफाई करणारे कंत्राटी कर्मचारी व अन्य विभागातील कर्मचारी चढले. त्यामुळे ट्रेन गर्दी झाल्याने एक तर रेल्वेने आणखी ट्रेन सोडाव्यात अथवा कंत्राटी कामगारांना त्यातून प्रवासाची मुभा देऊ नये, अशी मागणी रेल्वे कामगारांनी केली. त्या संदर्भातील व्हिडीओ रेल्वे कामगारांनी व्हायरल केला होता.