आर. टी. केंद्रेंना दिलेल्या सहा महिन्यांच्या मुदतवाढीवरून वादंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:44 AM2019-07-17T00:44:18+5:302019-07-17T00:44:21+5:30
वैद्यकीय व आरोग्य सेवा गट (अ) मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्याचा शासनाने निर्णय जाहीर केला आहे.
ठाणे : वैद्यकीय व आरोग्य सेवा गट (अ) मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्याचा शासनाने निर्णय जाहीर केला आहे. रुग्णांना आरोग्य सेवा देताना उद्भवणाºया डॉक्टरांचा तुटवडा कमी करण्यासाठी हा निर्णय असून जे वैद्यकीय अधिकारी थेट रुग्णसेवा देतात त्यांच्यासाठीच हा जीआर असून प्रशासनिकपदावर कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाºयांना तो लागू नाही, असा स्पष्ट उल्लेख त्यात आहे. त्यानंतरही त्याचा आधार घेऊन ठाणे महापालिकेने मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. तसेच, अमुक एक शासन निर्णय जाहीर होणार आहे हे गृहीत धरून त्यापूर्वीच आयुक्त ती कशी काय देऊ शकतात, असा सवाल करून याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी जागरूक नागरिकांनी सुरू केली आहे.
सुरुवातीला वैद्यकीय अधिकाºयांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षे होते. त्यानुसार आर. टी. केंद्रे यांची निवृत्ती जून २०१७ साली अपेक्षित होती. मात्र, पालिकेने त्यावेळी त्यांना दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर करून तो राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला होता. त्यावर मुदतवाढ देता येणार नाहीख असे शासनाने स्पष्ट केले आहे. असे असतांनाही त्यांना निवृत्त न करता त्याच पदावर काम करण्याची मुभा दिली होती. त्यानंतर २९ आॅगस्ट, २०१८ रोजी सरकारने एक जीआर काढून वैद्यकीय अधिकाºयांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याचा निर्णय घेतला. त्याचा आधार घेऊन केंद्रे यांना सेवेत कायम ठेवण्यात आले. ३० जून २०१९ रोजी केंद्रे हे वयाची ६० वर्षे पूर्ण करत असल्याने त्यांना निवृत्त करण्याचे आदेश उपायुक्त (मुख्यालय) ओमप्रकाश दिवटे यांनी २१ जून २०१९ रोजी काढले होते. मात्र, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी २९ तारखेलाच एका आदेशान्वये केंद्रे यांना मुदतवाढ दिल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. परंतु, केंद्रे यांचे पद हे प्रशासनिक असून ते कुठेही थेट आरोग्य सेवा देत नाही त्यामुळे त्यांना तो जीआर गैरलागू ठरतो. तसेच तो येण्यापूर्वी आयुक्तांनी कोणत्या अधिकारात ही मुदतवाढ दिली हा प्रश्नही केला जात आहे.