मोकळ्या रस्त्यावर रिक्षांचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 04:06 AM2018-09-20T04:06:04+5:302018-09-20T04:06:20+5:30
मोकळ्या रस्त्यावर रिक्षांनी अतिक्रमण केल्याने पुन्हा या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.
भिवंडी : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तीनबत्ती व तानाजीनगर येथील अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे केले. परंतु या मोकळ्या रस्त्यावर रिक्षांनी अतिक्रमण केल्याने पुन्हा या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.
मंडई ते कोटरगेट या मार्गादरम्यान नवीचाळ, तीनबत्ती, तानाजीनगर, हनुमान बावडी, कोटरगेट या ठिकाणी फेरीवाले, हातगाड्या व टपऱ्या असल्याने हा मार्ग अरूंद झाला होता. तर दर मंगळवारी तीनबत्ती स्लॅब ते रामेश्वर मंदिरापर्यंत भरत असलेल्या आठवडा बाजार रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतुकीस अडथळा येत होता. त्यामुळे हा आठवडा बाजार बंद करा अथवा रस्त्यावरील अतिक्रमणे उठवा अशा तक्रारी पालिकेकडे तक्रार केल्या होत्या. मात्र काही नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळे हे अतिक्रमण हटविण्यासाठी पालिका अधिकाºयांना अडथळे निर्माण केले होते. तरीही प्रभाग अधिकारी सोमनाथ सोष्टे, शाकीब खर्बे यांनी पोलीस बंदोवस्तात हे अतिक्रमण हटविले. त्यामुळे या परिसराने मोकळा श्वास घेतला. रस्ते व परिसर मोकळा झाल्याने पादचाºयांना व वाहनचालकांना विनाअडथळा जाण्यास मार्ग मोकळा झाला. परंतु चार दिवसातच मोकळ्या परिसरात रिक्षा उभ्या करण्यात आल्या. मंगळवारी आतील बाजूला बाजार भरला असतानाही रिक्षाचालकांनी रिक्षा मोकळ्या रस्त्यावर उभ्या केल्या.