शहापुरात शिवसेनेत राडा; पालकमंत्र्यांसमोर हुल्लडबाजी, सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 02:28 AM2018-01-10T02:28:18+5:302018-01-10T02:28:35+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेकडे पूर्ण बहुमत असतानाही शहापूर पंचायत समितीचे उपसभापतीपद आयत्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आल्याने स्थानिक नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याविरोधात संताप व्यक्त करून हुल्लडबाजी केली.
शहापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेकडे पूर्ण बहुमत असतानाही शहापूर पंचायत समितीचे उपसभापतीपद आयत्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आल्याने स्थानिक नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याविरोधात संताप व्यक्त करून हुल्लडबाजी केली. हा निर्णय का घेतला, हे शिंदे सांगण्याचा प्रयत्न करत असूनही कोणीही त्यांचे ऐकून घेतले नाही. या घटनेचा व्हिडीओ शिवसैनिकांनी व्हायरल केला. त्यानंतर शहरातील काही भागात शिंदे यांचे चित्र असलेले फलक फाडण्यात आले. सोशल मीडियावरून उलटसुलट टीका करण्यात आली. तसेच काही पदाधिकारी, शिवसैनिकांनी नाराजी दर्शवत राजीनामा सत्र सुरू केल्याने ‘मिशन जिल्हा परिषदे’च्या निमित्ताने सुरू झालेला हा वाद लगेचच शमण्याची चिन्हे नाहीत.
ठाणे जिल्हा परिषदेत पूर्ण बहुमत मिळणार नसल्याने शिवसेनेने शहापूर वगळता अन्य चार तालुक्यांत राष्ट्रवादीची मदत घेतली. तशीच मदत राष्ट्रवादीने शिवसेनेला करावी आणि या जिल्हा परिषदेवर प्रथमच शिवसेनेचा झेंडा फडकावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पक्षाचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या आणाभाका घेतल्या जात आहेत. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष (सेक्यूलर), कुणबी सेना, मनसे यातील ज्यांची ज्यांची मदत मिळेल ती घेतली. त्यामुळे हातातोंडाशी आलेला जिल्हा परिषदेच्या सत्तेचा घास शिवसेनेपासून हिरावण्यासाठी भाजपा जंगजंग पछाडत आहे.
भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्ष, उपाध्यक्षासोबत अन्य समित्यांची आॅफर दिली आहे. म्हणून शहापुरात राष्ट्रवादीला उपसभापतीपद देण्याची तडजोड करण्यात आली, असे सोमवारी एकनाथ शिंदे समजावून सांगत असताना शिवसैनिक मात्र ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांची जिल्हा प्रमुखांबरोबर बाचाबाची झाली. आम्हाला जिल्ह्याशी काही देणेघेणे नाही, असे सांगत त्यांनी हुल्लडबाजी केली. त्यामुळे शिंदे संतापले. निष्ठावंत शिवसैनिकांनी शिंदे यांचा निषेध केला. निवडणूक पार पाडून शिंदे परतल्यानंतरही या निर्णयाचे पडसाद उमटत राहिले. नडगाव येथे एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेल्या बॅनरची मोडतोड झाली. त्यांचे फोटो फाडले. सोशल मीडियावर संतप्त शिवसैनिकांच्या उलटसुलट चर्चा सुरु असून शिवसैनिकांत संताप कायम आहे. त्यातील काहींनी मंगळवारी राजीनामा सत्र सुरू केले. ज्यांच्या हातून उपसभापतीपद गेले त्यांच्या भावना तर कडवट आहेत.
उप जिल्हाप्रमुख शंकर खाडे यांनी सांगितले, रविवारी आम्ही सभापती आणि उपसभापतीपदी कुणाला बसवायचे, याची तयारी केली. मात्र सकाळी जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांचा आदेश आल्यानंतर शिवसेनेच्या हितासाठी जो निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी करण्यात आली. काही वेळा असे कठोर निर्णय घ्यायचे असतात. हा निर्णय चुकीचा नसून योग्य आहे. शिवसैनिकांमध्ये उमटलेल्या तीव्र भावनांशी मी सहमत आहे. त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांना शांत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे खाडे यांनी सांगितले.
उपसभापतीपद दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे यांनी शिवसेनेला धन्यवाद दिले. तालुक्यातील विकासकामे करण्यासाठी गेल्या १५ वर्षांत हक्काचे ठिकाण नव्हते. ते यातून मिळाले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आम्हीही जिल्हा परिषदेत शिवसेनेला मदत करणार आहोत. त्याचा उपयोग विकासकामांसाठी होईल. मात्र शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांबाबत शिवसैनिकांनी केलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सभापतीपद शहापूरला देण्याची चाल
शहापूरच्या शिवसैनिकांतील असंतोष शमावा आणि भविष्यात राष्ट्रवादीलाही रोखता यावे यासाठी जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाचा मान शहापूर तालुक्याला देण्याच्या हालचाली शिवसेनेत सुरू आहेत. तसे झाले तर पांडुरंग बरोरा यांच्याविरोधात पक्षाला ताकद मिळेल आणि शहापूरमधील भडकाही काही प्रमाणात कमी होईल, असे प्रयत्न सुरू आहेत.
या राजकारणात खरे तर पाचपैकी फक्त मुरबाडची पंचायत समिती भाजपाकडे गेली असती आणि चार शिवसेनेच्या ताब्यात राहिल्या असत्या. मुरबाडची भाजपाने एकहाती मिळवली. अंबरनाथ, शहापूरची शिवसेनेने राखली. पण दोन्ही ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादीला सोबत घेतले. पण भिवंडीची भाजपा-मनसेकडे गेली. कल्याणची भाजपामुळे राष्ट्रवादीकडे गेली. त्यामुळे पंचायत गेली तरी चालेल, पण जिल्हा परिषद काहीही झाले तरी राखायचीच या इर्षेने शिवसेना या लढाईत उतरली आहे.