राफेलची फाईल हरवली आहे कुठे मिळते का बघा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 02:07 PM2019-03-10T14:07:19+5:302019-03-10T14:37:41+5:30
ठाण्यातील नितीन कंपनी जवळील उड्डाणपुलावर रविवारी सकाळी काही अज्ञात व्यक्तींकडुन एक बॅनर लावण्यात आला आहे.
ठाणे - ठाण्यातील नितीन कंपनी जवळील उड्डाणपुलावर रविवारी सकाळी काही अज्ञात व्यक्तींकडुन एक बॅनर लावण्यात आला आहे. त्या बॅनरमध्ये काकू, मामा, मामी, दादा, ताई, राफेलची फाईल हरवली आहे. कुठे मिळते का बघा? कपाटात शोधा, गादीखाली शोधा. मिळाल्यास चौकीदाराची संर्पक साधा असे आवाहन केले आहे.
बॅनरवर कोणत्याही पक्षाचे नाव व चिन्ह नसल्याचे दिसत आहे. आज सकाळपासून हा बॅनर ठाण्यात पाहायला मिळत आहे. बुधवारी सुप्रीम कोर्टात राफेलप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी महाधिवक्ते के. के. वेणुगोपाल यांनी राफेल कराराची कागदपत्रे चोरी झाल्याचे सुप्रीम कोर्टाला सांगितले होते. एकीकडे पंतप्रधान मोदी हे चौकीदार असल्याचे सांगत आहेत. मात्र या चौकीदाराच्या ताब्यातूनच ही कागदपत्रे चोरीला गेल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या संतापाचे प्रतिबिंब सादर फ्लेक्समधून पाहावयास मिळाले आहे.
राफेल करार संदर्भाच्या कागदपत्रे गोपनीय होती, परंतु या कागदपत्रांच्या फोटोकॉपीज काढल्यामुळे ती सार्वजनिक झाली असे सांगितल्यानंतर देखील विरोधी लोकांकडून सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांसह देशभरातून सर्वांनी सरकारवर टीका करणे सुरू केले आहे. त्यामध्ये सामान्य नागरिकही सहभागी झाले आहेत.