डोंबिवलीतील बारवर पोलिसांची धाड: १५ बारबालांसह ६७ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 10:57 PM2018-12-20T22:57:26+5:302018-12-20T23:04:48+5:30
तोकडया कपडयांमध्ये अंगविक्षेप करीत ग्राहकांचे लक्ष वेधणाऱ्या १५ बार बालांसह ६७ जणांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने बुधवारी पहाटेच्या सुमारास कारवाई केली.
ठाणे: विहित वेळेपेक्षा जास्त वेळ बारमध्ये तोकडया कपडयांमध्ये नृत्य करणा-या १५ बारबाला, २५ ग्राहक, १० वेटर अशा ६७ जणांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बुधवारी डोंबिवली पूर्वेतील टिळकनगर येथील बारमध्ये पहाटेच्या सुमारास कारवाई केली. यावेळी बारमधील दोन लाख दहा हजारांची रोकडही जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शेलार नाका येथील हॉटेल विक्रांत पॅलेस अॅन्ड बार याठिकाणी रात्री उशिरापर्यंत बारच्या मुली उशिरापर्यंत थांबून तोकडया कपडयांमध्ये अश्लील चाळे करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पथक आणि टिळकनगर पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत २० डिसेंबर रोजी पहाटे १ ते ३ वा. च्या सुमारास याठिकाणी धाडसत्र राबविण्यात आले. मुळात रात्री ९.३० नंतर आॅर्केस्ट्रामधील चार मुलींना बारमध्ये थांबण्याची परवानगी असतांना याठिकाणी १५ मुली आढळून आल्या. शिवाय, हा बार उशिरापर्यंत सुरु होता. त्यामुळे हे धाडसत्र राबविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.