उल्हासनगरात एका प्लास्टिक कारखान्यावर धाड ३६५ किलो प्लास्टिक पिशव्याचा साठा जप्त
By सदानंद नाईक | Published: July 10, 2024 04:42 PM2024-07-10T16:42:45+5:302024-07-10T16:43:00+5:30
कारखान्यावर कारवाई करीत १० हजारात दंड ठोठावला असून प्लास्टिक कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले.
उल्हासनगर : महापालिका व प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्याने संयुक्तपणे मंगळवारी कॅम्प नं-२, पशुमल कंपाऊंड येथील एका कारखान्यावर धाड टाकून ३६५ किलो प्लास्टिक जप्त केले. तसेच कारखान्यावर कारवाई करीत १० हजारात दंड ठोठावला असून प्लास्टिक कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले.
उल्हासनगरात नावालाच प्लास्टिक बंदी असून सर्रासपणे प्लास्टिक पिशव्याचा वापर होत आहे. कॅम्प नं-२, पशुमल कंपाऊंड मध्ये एका कारखान्यात प्लास्टिक कारखाना सुरू असल्याची प्रदूषण मंडळ व महापालिका अधिकाऱ्यांना मिळाल्यावर मंगळवारी संयुक्तपणे कारवाई करण्यात आली. कारवाईत ३६५ किलो प्लास्टिक जप्त केला असून कंपनीवर १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्या अन्य दुकांदारावर ५ हजाराचा दंड ठोठावला आहे. या कारवाईत अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, सहायक सार्वजनिक अधिकारी मनीष हिवरे, प्रदूषण मंडळाचे अधिकारी नांदगावकर आदीजन सहभागी झाले होते.
शहरात प्लास्टिक बंदी असतांनाही प्लास्टिक पिशव्याचा सर्रासपणे देवाणघेवाण सुरू आहे. परिणामी पावसाळ्यात नाल्यामध्ये प्लास्टिक पिशव्या अडकून नाले तुंबल्याच्या घटना शहरात होत आहेत. प्लास्टिक पिसव्याने नाले तुंबल्याचा कबुली महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी महापालिकेच्या विविध विभागाना प्लॅस्टिकवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आरोग्य स्वच्छता विभागाद्वारे याआठवड्या अस्वच्छता करणाऱ्या २५१ व्यक्ती विरुद्ध कारवाई करीत ९८ हजार, ५५० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर एकल प्लास्टिक पिशवीचा वापर व विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर विरुद्ध कारवाई करीत ५५ हजाराचा दंड तर ५०२ किलो प्लास्टिक जप्त केले. असा एकूण १ लाख ५३ हजार ५५० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहेत.
शहरातील सर्व मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, फुटपाथ, नाली विषेश सफाई व स्वच्छता करुन नागरीकांना स्वच्छतेबाबत महापालिकेच्या वतीने संदेश देवुन जनजागृती केली जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. नागरीकांना शिस्त लागावी, या करीता अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरीकांना सूचना व नोटीसा देऊनही सार्वजनिक रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाईचा इशाराही महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.