ठाणे जिल्ह्यातील रासायनिक कंपन्या, बंद कारखाने,गोदामे, फार्म हाऊसवर धाड सत्र

By सुरेश लोखंडे | Published: October 31, 2023 06:19 PM2023-10-31T18:19:12+5:302023-10-31T18:19:31+5:30

अंमली पदार्थाविरोधात पोलिसांची कडक कारवाई

Raid session on chemical companies, closed factories, warehouses, farm houses in Thane district | ठाणे जिल्ह्यातील रासायनिक कंपन्या, बंद कारखाने,गोदामे, फार्म हाऊसवर धाड सत्र

ठाणे जिल्ह्यातील रासायनिक कंपन्या, बंद कारखाने,गोदामे, फार्म हाऊसवर धाड सत्र

ठाणे : सध्या वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा पोलिसांनी पकडला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील जिल्हा पोलीस, तीनही पोलीस आयुक्तालयांनी कठोर पावले उचलली आहे. रासायनिक कंपन्या, कारखाने, बंद पडलेली कारखाने, फार्म हाऊसेस आदी ठिकाणांबरोबरच संशयास्पद ठिकाणी अचानक धाड टाकून मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम हाती घेतली आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

सध्या सुरू असलेल्या धाड सत्रात जिल्हा पोलिसांनी २३१ कंपन्यांची तपासणी केली आहे. ठाणे जिल्हा अंमली पदार्थमुक्त ठेवण्यासाठी व जिल्ह्यात ड्रगला थारा मिळू नये, यासाठी पोलिसांसह विविध शासकीय यंत्रणांनी कंबर कसली आहे. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोहीम राबविण्यात येत असून यासंबंधीचा आढावा जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती व जिल्हास्तरीय नार्कोकॉओर्डिनेशन समितीची संयुक्त बैठकीत आज घेण्यात आला. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अन्न व औषधे प्रशासनचे सहाय्यक आयुक्त (औषधे) रा. पं. चौधरी, सहाय्यक आयुक्त (अन्न) व्य. व. वेदपाठक, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे अधीक्षक श्याम भालेराव, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक चारुदत्त हांडे, कृषी उपसंचालक डी.एस. घोलप, टपाल विभागाच्या अमिता सिंह, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय साळुंखे, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्यासह जिल्हा आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यात कोणत्याही मार्गाने ड्रगचा शिरकाव होऊ नये, यासाठी सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या व संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना कळविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. बटण या औषधाच्या विक्रीवर विशेष लक्ष ठेवण्यात यावे. प्रत्येक विभागाने अंमली पदार्थांच्या विक्री, वितरण व उत्पादन निर्मिती यावर बारकाईने लक्ष देण्याच्या खास सुचना त्यांनी यावेळी दिल्या. अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील शाळा, महाविद्यालये, पान टपऱ्या यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचेही निर्देश दिले.
एखाद्या कारवाईत अंमली पदार्थ सापडल्यास तो पदार्थ कोठून आला व पुढे तो कोठे पाठविण्यात येणार होता, याची माहिती शोधून अंमली पदार्थाची वाहतुकीची पाळेमुळे खोदून काढण्याचा निर्धारही या बैठकीत करण्यात आला.

ग्रामीणमधील फार्म हाऊस, गोदामे व कंपन्यांची तपासणी 

जिल्हा पोलीस दलाने मागील पंधरा दिवसात ग्रामीण भागातील २३१ कंपन्या,१११ गोदामे, १९७ फार्म हाऊस यांची तपासणी करण्यात आल्याचे बैठकीत उघड झाले आहे. या दरम्यान १८ व्यसनमुक्ती केंद्रांचीही तपासणी करण्यात आली. या धाड सत्राच्या कालावधीत औद्योगिक जागा, बंद पडलेल्या फॅक्टरीज, संशयास्पद जागा या ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असल्याचे देशमाने यांनी सांगितले.

अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयाने कोडीन सिरप, अल्पाझोलम, डायझपाम अशा गुंगीसाठी गैरवापर होणाऱ्या औषधांच्या संदर्भात जिल्ह्यातील ७९ दुकानांची तपासणी केली असून त्यात काहीही अक्षपार्य आढळून आले नाही. तीस उत्पादकांच्या तपासण्या केल्या आहेत. औषध विक्रेत्यांकडील खरेदी-विक्री व शिल्लक साठा तपशील जुळला नाही, अशा दुकानांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कारवाईत दहा महिन्यात तीन कोटींचा माल जप्त
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने १ जानेवारी ते ३० ऑक्टोबर या कालावधीत अंमली पदार्थाविरोधी कारवाईत ८१९ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ७४० किलो ६४७ ग्रॅम गांजा, १ किलो ८२० ग्रॅम मेफेड्रॉन, १२ हजार ७१९ कफ सिरप बाटल्या, ५०० गोळ्या, आठ किलो १८३ ग्रॅम चरस, २२ ग्रॅम वजनाचे एसएलडी पेपर, १३ ग्रॅम हेरॉईन पकडले आहे. एकूण तीन कोटी ९३ लाख ७४ हजार रुपये इतका मुद्देमाल जप्त केला आहे. पार्सलद्वारे येणाऱ्या अमंली पदार्थांवर विशेष नजर असल्याचे यावेळी चचेर्त उघड झाले.

Web Title: Raid session on chemical companies, closed factories, warehouses, farm houses in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.