मुंब्रा येथील गावठी दारु निर्मितीच्या अड्डयांवर धाड: रसायनासह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 23:39 IST2020-06-22T23:36:09+5:302020-06-22T23:39:17+5:30
ठाण्यातील मुंब्रा खाडी किनारी गावठी दारु निर्मितीच्या भट्टयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाडसत्र राबवून मोठी कारवाई केली. या धाडीत गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे १३ हजार लीटर रसायन आणि गुळयाच्या गोण्या असा सुमारे तीन लाख २२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याठाणे भरारी पथकाने मुंब्रा खाडी किनारी गावठी दारु निर्मितीच्या भट्टयांवर धाडसत्र राबवून मोठी कारवाई केली. या धाडीत गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे १३ हजार लीटर रसायन आणि गुळयाच्या गोण्या असा सुमारे तीन लाख २२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गेल्या चार दिवसांमध्ये पाच गुन्हे दाखल करुन एकास अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक सुनिल कणसे यांच्या पथकाने १८ ते २१ जून या चार दिवसांच्या काळात मुंब्रा आणि दिवा परिसरातील खाडी किनारी हे धाडसत्र राबविले. यावेळी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या खाडी किनारी कांदळवनाने व्यापलेल्या भागात मोठया प्रमाणात गावठी दारू निर्मितीच्या भट्टया सुरु असल्याचे आढळले. भरारी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये पाच दारूच्या भट्टया उद्धवस्त करण्यात आल्या. तर रसायनाने भरलेले १३ हजार लीटर प्लास्टीकचे ड्रम, २०० लीटर क्षमतेचे गावठी दारुने भरलेले प्लास्टीकचे ड्रम, ५०० लीटर क्षमतेचे रसायनाने भरलेले दोन मोठे ढोल आणि २४ गोण्या गोण्या गुळ असे गावठी दारूच्या निर्मितीसाठी लागणारे रसायन जप्त करुन ते नष्ट करण्यात आले. याप्रकरणी एकास अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.