देसाई खाडीत चार ठिकाणी दारूअड्ड्यांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:36 AM2021-08-01T04:36:45+5:302021-08-01T04:36:45+5:30
ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे आणि डोंबिवली भरारी पथकाने केलेल्या एकत्रित कारवाईत दिवा देसाई खाडीत बुधवारी ...
ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे आणि डोंबिवली भरारी पथकाने केलेल्या एकत्रित कारवाईत दिवा देसाई खाडीत बुधवारी चार ठिकाणी छापे टाकून १९ हजार ५०० लीटर दारूच्या रसायनाचे ६०० रिकामे ड्रम आणि इतर साहित्य असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन मोटरबोटींच्या साहाय्याने खारफुटीच्या जंगलात ही कारवाई करण्यात आली.
गावठी दारू बनवायला बंदी असून लपूनछपून हा धंदा सुरू आहे. खाडी परिसरातील खारफुटीच्या जंगलातील अवैध दारू व्यवसायांवर छापा मारण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकात तीन महिन्यांपूर्वी आठ मोटारबोटी घेण्यात आल्या आहेत. दिवा देसाई खाडीतील पूर्व भागात हातभट्टीची दारू बनवत असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागीय अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे-डोंबिवलीच्या भरारी पथकाने छापा मारून दारू रसायनाने भरलेले दोनशे लीटरचे ९० ड्रम नष्ट केल्याची माहिती विभागाचे निरीक्षक आनंदा कांबळे यांनी दिली. दोन मोटरबोटींच्या साहाय्याने प्रवास करून खारफुटीच्या जंगलात चार ठिकाणी हे छापे मारण्यात आले. यावेळी दारू गाळण्याचे साहित्यही जप्त करण्यात आले. यात १९ हजार ५०० लीटर दारूचे रसायन, ६०० रिकामे ड्रम आणि इतर समान मिळून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, कारवाईची कुणकुण लागणारे दारू गाळणारे आधीच पसार झाले हाेते.