पर्यावरण रक्षणाकरिता रायगड ते एव्हरेस्ट पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:39 AM2021-07-29T04:39:51+5:302021-07-29T04:39:51+5:30

नितीन पंडित भिवंडी : ‘एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचं’ ही पर्यावरण रक्षणाची मोहीम हाती घेऊन रायगड ते सर्वोच्च ...

Raigad to Everest trek to protect the environment | पर्यावरण रक्षणाकरिता रायगड ते एव्हरेस्ट पदयात्रा

पर्यावरण रक्षणाकरिता रायगड ते एव्हरेस्ट पदयात्रा

Next

नितीन पंडित

भिवंडी : ‘एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचं’ ही पर्यावरण रक्षणाची मोहीम हाती घेऊन रायगड ते सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट असे सुमारे दोन हजार किलोमीटरचे अंतर पायी चालत जाण्याचा उपक्रम भिवंडीतील २४ वर्षांच्या सिद्धार्थ गणाई याने हाती घेतला आहे. या प्रवासात गणाई वेगवेगळ्या गावात, शहरात तेथील नागरिकांना झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देणार आहे. सिद्धार्थच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

गणाई या ध्येयवेड्या पर्यावरणवादी तरुणाने २० जुलै रोजी किल्ले रायगड येथील छ. शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रायगड ते माउंट एव्हरेस्ट या मोहिमेला सुरुवात केली. सिद्धार्थ अंधेरी येथील भवन्स महाविद्यालयात बी.एस्सी.च्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असून भिवंडीतील बापगाव येथील मैत्रिकुल येथे तो आपल्या मित्रांसोबत राहतो. पाच वर्षांपासून त्याने माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. मात्र त्यासाठी येणारा खर्च मोठा असल्याने सिद्धार्थने मोटारसायकल, सायकल, स्केटिंग अशा सर्व पर्यायांचा विचार व अभ्यास केला. मात्र त्यात खर्च व अडचणी जास्त असल्याने सिद्धार्थने पायी प्रवास करून माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार केला. या मोहिमेत चालत जातांना प्रकृती बिघडू नये म्हणून फक्त घरचे जेवण व पाणी मिळावे, असे आवाहन तो पायी जाताना करत आहे. शिवाय ‘एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचं’ हा सामाजिक संदेश देत आहे.

सिद्धार्थचे बालपण अत्यंत हलाखीत गेले. तो लहान असतानाच आईवडिलांचा घटस्फोट झाला. त्यावेळी पालन-पोषणाची जबाबदारी वडिलांनी स्वीकारली; मात्र वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लहानपणी एक ते दोन वर्षे सिद्धार्थने मुंबईतील अंधेरी येथील एका पुलाखाली बालपण काढले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने सिद्धार्थच्या आईचा शोध घेण्यात आला. त्याची आई केरळ येथे असल्याने सिद्धार्थचे प्राथमिक शिक्षण केरळ येथे झाले. २०११ पासून तो मुंबईत परतला. त्यानंतर मावशी व इतर नातेवाइकांनी त्याचा सांभाळ केला. सध्या तो भिवंडीतील बापगाव येथील मैत्रीकुल येथे राहत असून विद्यार्थी भारती संघटनेचा सदस्य आहे. त्याच्या या मोहिमेला कोणतीही शासकीय मदत मिळालेली नसून त्याने स्वतःच पायपीट करून आपले स्वप्न साकार करण्याचे ठरवले आहे. सिद्धार्थ याचा नवव्या दिवसाचा प्रवास भिवंडीतून सुरू झाला. यावेळी पडघा परिसरातील युवा कवी मिलिंद जाधव यांनी त्याचे स्वागत केले. एक झाड लावून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

..............

झाडांची होत असलेली कत्तल आणि निसर्गाचा कोप ही परिस्थिती मानवावर ओढवण्याचे मूळ कारण आपणच आहोत, ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणारे देखील आपणच असणार आहोत. यासाठी हा एक छोटा प्रयत्न करत आहे.

-सिद्धार्थ गणाई, पर्यावरणवादी कार्यकर्ता, भिवंडी

............

वाचली

Web Title: Raigad to Everest trek to protect the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.