रेल्वेत बॉम्बची अफवा पसरवणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:24 AM2018-06-02T01:24:36+5:302018-06-02T01:24:36+5:30
घरातून निघताना उशिर झाल्याने आईची गाडी चुकू नये
कल्याण : घरातून निघताना उशिर झाल्याने आईची गाडी चुकू नये, यासाठी पोलीस नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून उद्योगनगरी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती देणाऱ्या श्रवण कुमार (रा. वांगणी) याला रेल्वे पोलिसांनी पाच महिन्यांनी अटक केली आहे. रेल्वे न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
श्रवणच्या आईला २८ जानेवारीला पाटणा येथे जायचे होते. त्यासाठी त्याने ‘उद्योगनगरी’चे तिकीट आरक्षित केले होते. ही गाडी कल्याण स्थानकातून सायंकाळी ५.३० वाजता सुटणार होती. परंतु, वांगणी येथून निघताना त्याला आणि आईला उशिरा झाल्याने वेळेत कल्याणला पोहोचणे कठीण होते. त्यामुळे त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला निनावी फोन करून ‘उद्योगनगरी’मध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. मात्र, तोपर्यंत गाडीने कल्याण सोडले होते. रेल्वेने ही गाडी खर्डी येथे थांबवली. रेल्वे पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथकाला पाचारण केले. तीन तासांच्या तपासणीनंतर गाडीत काहीच संशस्यापद आढळले नाही. त्यामुळे या गाडीबरोबरच कल्याण-कसारा मार्गावरील उपनगरी लोकल, लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही तीन तासांचा खोळंबा झाला. पोलिसांनी निनावी फोन करणाºयांचा शोध घेणे सुरू केले. अखेर, पाच महिन्यांनंतर श्रवणला अटक करण्यास त्यांना यश आले.