बदलापूरमध्ये सहा तासापासून रेल रोको सुरूच; संतप्त आंदोलकांचा माघार घेण्यास नकार
By पंकज पाटील | Updated: August 20, 2024 15:51 IST2024-08-20T15:49:54+5:302024-08-20T15:51:05+5:30
Badlapur Rail Roko News: बदलापुरात विद्यार्थिनीच्या अत्याचार प्रकरणातील आंदोलन अद्यापही संपुष्टात आलेले नाही. गेल्या सहा तासापासून संतप्त आंदोलनकर्त्यांनी रेल रोको सुरूच ठेवले आहे.

बदलापूरमध्ये सहा तासापासून रेल रोको सुरूच; संतप्त आंदोलकांचा माघार घेण्यास नकार
- पंकज पाटील
बदलापूर - बदलापुरात विद्यार्थिनीच्या अत्याचार प्रकरणातील आंदोलन अद्यापही संपुष्टात आलेले नाही. गेल्या सहा तासापासून संतप्त आंदोलनकर्त्यांनी रेल रोको सुरूच ठेवले आहे. अनेक विनवण्या करून देखील आंदोलक माघार घेण्यास तयार नाहीत. मुख्यमंत्री जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी अट आंदोलन कर्त्यांनी टाकली आहे.
बदलापुरात चार वर्षाच्या दोन चिमुकलींवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडली होती. त्यानंतर बदलापूर संतप्त वातावरण पसरले आहे. आज सकाळी सात वाजता बदलापूरच्या आदर्श महाविद्यालयाच्या परिसरात पालकांनी ठिय्या आंदोलन केले. या ठिकाणी उस्फूर्तपणे बदलापूरकर नागरिक देखील सहभागी झाले होते. हे आंदोलन 10 वाजेपर्यंत सुरू असताना अचानक या संतप्त आंदोलनकर्त्यांनी रेल रोको करून गेल्या सहा तासापासून रेल्वे सेवा ठप्प करून ठेवली आहे. आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनामार्फत सुरू होता. मात्र आंदोलक आरोपीला फाशी देण्याच्या मुद्द्यावर कायम राहिल्याने पोलीस प्रशासन आणि आंदोलन यांच्यामध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही.
रेल्वेचे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी देखील आंदोलकांसोबत अनेक वेळा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक 'फाशी द्या, फाशी द्या' या आपल्या घोषणांवरच कायम राहिले. त्यानंतर उल्हासनगरचे डीसीपी सुधाकर पाठारे यांनी देखील आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात देखील त्यांना अपयश आले. सहा तास रेल्वे सेवार्थ करून प्रवाशांनी आपल्या मागण्यांवर कायम राहण्याचा निर्णय घेतला.