‘रेल रोको’ आंदोलन; ३६ जणांना जामीन, उल्हासनगरच्या वकिलांनी लढविला किल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 05:45 AM2024-08-24T05:45:12+5:302024-08-24T05:45:24+5:30
उल्हासनगरातील वकिलांच्या टीमने अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांची बाजू न्यायालयात मोफत मांडली.
उल्हासनगर : बदलापूर येथील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर शाळेत तोडफोड करणाऱ्या व रेल्वे स्थानकात ‘रेल रोको’करणाऱ्या ३६ आरोपींना शुक्रवारी न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती ॲड. प्रवीण अटकले यांनी दिली. त्यापैकी १० जणांची १५ हजारांच्या वैयक्तिक जामिनावर गुरुवारी सुटका झाली होती.
उल्हासनगरातील वकिलांच्या टीमने अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांची बाजू न्यायालयात मोफत मांडली. अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांची पोलिस व सरकारी वकिलांनी १० दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. मात्र, वकिलांनी आक्रमक बाजू मांडल्याने, सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली होती. त्यामुळे आंदोलनकर्त्यांचे जामीन लवकर झाल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. पोलिसांनी अटक केलेल्या ३६ पैकी १० जणांना बुधवारी सायंकाळी उशिरा न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
...यांनी मांडली आंदोलनकर्त्यांची बाजू
शुक्रवारी ३६ जणांना जामीन मंजूर झाला. उल्हासनगर येथील ॲड. उमेश केदार, ॲड. कल्पेश माने, ॲड. प्रवीण अटकले, ॲड. कल्पेश माने, ॲड. संजय सोनावणे, ॲड. जय गायकवाड, ॲड. जय शिरसाट, ॲड. संजय सूर्यवंशी, ॲड. सत्यम पिल्ले, ॲड. प्रकाश खडे, ॲड. राहुल बनकर आदींच्या टीमने आंदोलनकर्त्यांची बाजू न्यायालयात मांडली.
अटकेच्या भीतीने अनेकजण भूमिगत
बदलापूर पोलिसांनी शाळेसमोर व शहरात आंदोलन करणाऱ्या १३०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल केले. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना पोलिस अटक करीत आहेत. अटकेच्या भीतीने आंदोलनात सहभाग घेतलेले अनेकजण भूमिगत झाल्याचे बोलले जात आहे.