कोरेगाव-भीमा प्रकरणी ठाणे स्थानकात रेल रोको, भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंना अटक करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 01:45 PM2018-01-04T13:45:02+5:302018-01-04T14:02:03+5:30
कोरेगाव-भीमाप्रकरणी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत गुरुवारी ठाणे रेल्वे स्थानकात रेल रोको करण्यात आला. दलित युथ पँथरच्या कार्यकर्त्यांनी हा रेल रोको केला होता.
ठाणे - कोरेगाव-भीमा प्रकरणी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत गुरुवारी ठाणे रेल्वे स्थानकात रेल रोको करण्यात आला. दलित युथ पँथरच्या कार्यकर्त्यांनी हा रेल रोको केला होता. काही वेळासाठी त्यांनी रेल्वे रोखून धरली होती. यावेळी दलित युथ पँथरच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजीही केली. दरम्यान, रेल रोको करणाऱ्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून रेल्वे वाहतूक आता सुरळीत झाली आहे.
गुरुवारी सकाळी दलित युथ पँथरचे कार्यकर्ते भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंना अटक करावी अशी मागणी करत रेल्वे रुळावर उतरले होते. मुंबईच्या दिशेने जाणारी फलाट क्रमांक चारवर जाणारी रेल रोको या कार्यकर्त्यांनी रोखून धरली होती. यामुळे काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सध्या वाहतूक सुरळीत सुरु आहे.
कोरेगाव-भीमाघटनेचे पडसाद गेले दोन दिवस संपुर्ण महाराष्ट्रभर पहायला मिळाले. बुधवारी घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली होती. कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या बंदने मुंबईत हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी दुकाने बंद करण्यासोबतच खासगी वाहनांची तोडफोड, जाळपोळ करीत पोलीस ठाण्यांवरही दगडफेक केली. आंदोलनकर्ते हिंसक झाल्याने मुंबईत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. असे असले तरी मुंबई पोलिसांनी संयम राखत लाठीचार्ज न करताही जमाव नियंत्रित राहील याची काळजी घेतली. तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी २५० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
आंदोलनादरम्यान, विक्रोळी गोदरेज कंपनीच्या गेटपासून ते गांधीनगर जंक्शन परिसरातील एकामागोमाग एक अशा २००हून अधिक खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर भांडुप ते पवईच्या दिशेनेही रस्त्याकडेला पार्क केलेल्या खासगी बसेस आणि बेस्ट बसेस आंदोलकांनी लक्ष्य केल्याचे पाहावयास मिळाले. रेल रोको, रास्ता रोकोवर नियंत्रण आणताना पोलिसांची दमछाक झाली. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. अशात पवईच्या हिरानंदानी आणि आयआयटी परिसराबाहेर दुपारी तणाव वाढला. आंदोलकांनी खासगी सोसायटीतील सामानाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्यामुळे रहिवासी आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. अशात येथील काही आंदोलकांना पवई पोलिसांनी ताब्यात घेतले. याच्या निषेधार्थ आंदोलकांनी पवई पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांच्यासह पोलीस अंमलदार शेलार, साठे, परब, कोळी, घोळवे, वाव्हळ, बादकर, कदम, जाधव आणि घोडेस्वार असे एकूण ११ जण जखमी झाले आहेत.
चेंबूरच्या खारदेवनगरात दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात दगडफेक झाली. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गेलेल्या गोवंडी पोलीस ठाण्याच्या १ क्रमांकाच्या गाडीची तोडफोड करत पोलिसांवरच दगडफेक करण्यात आली. यामध्ये सपोनि घोडे, घाडगे, अहिरे, जाधव तसेच चंद्रकांत निकम, मल्हारी मलबे, राजेंद्र पाटील, सोमनाथ सिंग, सागर जगताप, पूनम जोदे, धोंडीराम सरगर, किशोर भामरे, अजित तडवी, जीवन मोहिते हे पोलीस जखमी झाले. मुंबईतील अन्य भागांतही जमावावर नियंत्रण आणताना काही पोलीस किरकोळ जखमी झाले. तर तोडफोडीमध्ये काही बसचालक जखमी झाले.