विनातिकीट प्रवास करणाऱ्या १ हजार ७३१ प्रवाशांवर रेल्वेकडून कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 06:02 PM2024-02-03T18:02:18+5:302024-02-03T18:02:30+5:30
६ लाख २ हजार ६५५ रुपयांचा दंड वसूल.
ठाणे : मध्य रेल्वे प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानकांवर तसेच प्रवासादरम्यान प्रवाशांची तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी ७.१५ ते दुपारी ३ या अवघ्या सात तासांत रेल्वेने केलेल्या या कारवाईत ठाणे स्थानकावर रेल्वेने १ हजार ७३१ प्रवाशांकडे तिकीट नसल्याचे तपासणीत दिसून आले आहे. त्यानुसार त्यांच्याकडून ६ लाख ०२ हजार ६५५ रुपयांचा दंड वसूल केला गेला आहे. या कारवाईत एकूण ६९ रेल्वे कर्मचाºयांसह १७ रेल्वे सुरक्षा कर्मचाºयांचा मोठा फौजफाटा ठाणे स्थानकावर या कारवाईअंतर्गत तैनात होता.
मध्य रेल्वेवरील ठाणे रेल्वे स्थानक हे अत्यंत गजबजलेले आणि वर्दळीचे स्थानक मानले जाते. या स्थानकावरून उपनगरीय गाड्या तसेच लांब पल्याच्या गाड्या दिवसभर धावतात. त्यामुळे एका दिवसात सुमारे ५ ते ७ लाख प्रवासी ठाणे स्थानकातून ये-जा करतात. ठाणे स्थानकातून कर्जत, कसारा, मुंबई, नवी मुंबई, पनवेलकडे जाणाºया उपनगरीय गाड्यांची संख्याही मोठी आहे. दिवसेंदिवस प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे या सर्व गाड्यांना नेहमीच गर्दी असते. विना तिकीट प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पैसे खर्च करून आणि तिकीट खरेदी करून नियमित प्रवास करणाºया प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
फर्स्ट क्लासच्या डब्यांसह, एसी लोकल ट्रेनमधील काही प्रवासी अनवधानाने विना तिकीट किंवा त्या वगार्चे तिकीट नसताना प्रवास करतात. त्यामुळे अनेकदा प्रवाशांमध्ये वाद होतात. अनेक प्रवाशांनी आपल्या तक्रारी मध्य रेल्वे प्रशासनाकडे लेखी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या डोंबिवली, कल्याण, ठाणे, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यासोबतच प्रवासादरम्यान प्रवाशांची तिकिटे तपासली जात आहेत. या कारवाईदरम्यान प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. प्लॅटफॉर्मसह फूटब्रिज, रेल्वे स्थानकांचे एक्झिट गेट येथे रेल्वे सुरक्षा कर्मचाºयांसह प्रवाशांची तिकीट तपासणी केली जात असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या मोहिमेदरम्यान ठाणे स्थानकावर १ हजार ७३१ तिकीटविहीन प्रवासी आढळून आले असून त्यांच्याकडून ६ लाख २ हजार ६५५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ७.१५ ते दुपारी २ या वेळेत ही मोहीम राबविण्यात आली. यासाठी ६९ तिकीट तपासनीस तपासणीसाठी तैनात करण्यात आले असून त्यांच्या सुरक्षेसाठी १७ आरपीएफ कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने एक प्रकारे चाप लावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.