रेल्वेचा ब्लॉक रस्ते वाहतुकीच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 11:53 PM2019-12-25T23:53:00+5:302019-12-25T23:53:29+5:30

रखडत का होईना ‘केडीएमटी’च धावली : बाजीप्रभू चौकातील स्टॅण्डवर झुंबड

Railway block at the root of the road traffic | रेल्वेचा ब्लॉक रस्ते वाहतुकीच्या मुळावर

रेल्वेचा ब्लॉक रस्ते वाहतुकीच्या मुळावर

Next

डोंबिवली : मध्य रेल्वेने बुधवारी नाताळच्या सुटीचे निमित्त साधून ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी कल्याण-डोंबिवलीदरम्यान रेल्वेमार्गावर विशेष ब्लॉक घेतला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून केडीएमटीने जादा बस सोडल्या खऱ्या, पण उपक्रमातील नादुरुस्त बस आणि उद्भवलेली वाहतूककोंडी या कचाट्यात सापडलेली केडीएमटी रखडत का होईना प्रवाशांसाठी धावली. तर, दुसरीकडे मात्र रिक्षाचालकांनी जादा भाडे आकारल्याने प्रवाशांना भरगच्च भरलेल्या बसमधूनच कल्याण गाठावे लागल्याचे चित्र डोंबिवलीत पाहायला मिळाले.

ब्लॉकच्या कालावधीत २० विशेष बस सोडण्याचे केडीएमटी उपक्रमाने जाहीर केले होते. परंतु, बुधवारी कल्याणहून १२ आणि डोंबिवलीहून १२, अशा २४ बस सोडण्याचे नियोजन केले होते. डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकातून या बस सोडण्यात आल्या. सकाळी ९.४५ ला ब्लॉक सुरू झाला. तेव्हापासूनच कल्याणकडे मार्गस्थ होणाºया प्रवाशांनी बाजीप्रभू चौकाकडे कूच करण्यास सुरुवात केली. परिवहन उपक्रमातील अधिकारी आणि परिवहनचे सदस्य यांनी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी ९ वाजल्यापासूनच हजेरी लावली होती. रेल्वेचा ब्लॉक सुरू होताच हळूहळू बसमधून प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या वाढत गेली. कालांतराने येथील चौकातील स्टॅण्डवर प्रवाशांची अक्षरश: झुंबड उडाली होती. प्रवाशांची वाढणारी संख्या पाहता सर्वांना रांगेत उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले.
कल्याणहून डोंबिवलीकडे मार्गस्थ झालेली केडीएमटी उपक्रमाची बस कल्याणच्या पत्रीपुलाच्या अलीकडे बंद पडल्याने तेथे अभूतपूर्व कोंडी झाली. यात वाहतूक पोलिसांची चांगलीच कसरत झाली. कालांतराने ती बस तेथून बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. परंतु, त्या वाहतूककोंडीचा परिणाम सर्वच ठिकाणी जाणवला. पत्रीपुलालगत असलेला कचोरे परिसर, कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्याचा काही भाग, अथवा टाटानाका याठिकाणापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तेथील वाहतूककोंडीत केडीएमटीच्या बस अडकल्याने डोंबिवलीतील प्रवाशांची गर्दी वाढतच होती. त्यावेळी काही प्रवाशांनी रिक्षा व टॅक्सीचा पर्याय स्वीकारला. परंतु, रिक्षाचालकांकडून शेअरसाठी प्रतिप्रवासी ५० रुपये भाडे आकारण्याची मनमानी पाहता बहुतांश प्रवाशांनी रांगेत उभे राहून बसची प्रतीक्षा करण्यात धन्यता मानली. प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारून सेवा देण्याचे आवाहन केले असता ते झुगारून १५० ते २०० रुपये भाडे द्यावे लागेल, अशा अरेरावीलाही प्रवाशांना सामोरे जावे लागले.

दरम्यान, केडीएमटीने निवासी विभाग आणि दावडी या अन्य मार्गांवरील बस कल्याणच्या दिशेने वळवून प्रवाशांना दिलासा दिला. पत्रीपूल परिसराप्रमाणे डोंबिवली पूर्वेकडील पी.पी. चेंबर परिसरातही बस नादुरुस्त होण्याचा प्रकार
घडला होता. दरम्यान, कल्याणमध्येही रिक्षाचालकांनी जादा भाडे आकारले, असे प्रवाशांनी सांगितले.

कल्याणहून डोंबिवली १२५ रुपये, तर ठाणे २०० रुपये
१ब्लॉकच्या दरम्यान कल्याणहून डोंबिवलीकडे एकही लोकल धावली नसल्याने केडीएमटीच्या बसला कल्याणमध्येही मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी होती. ब्लॉकचा गैरफायदा घेत रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून दुप्पट पैसे उकळले. कल्याण ते डोंबिवलीसाठी प्रतिप्रवासी ७५ ते १०० रुपये तर, कल्याण ते ठाण्यासाठी १५० ते २०० रुपये भाडे आकारत प्रवाशांची पिळवणूक केली.
२मात्र, केडीएमटी आणि एसटी महामंडळाने सोडलेल्या अतिरिक्त बसमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. या बस सकाळपासूनच तुडुंब भरून डोंबिवलीच्या दिशेने जात होत्या.
३ एसटी आगारातून सोडण्यात येणाºया बससाठी प्रवाशांची बरीच मोठी रांग लागली होती. मात्र, ५ ते १० मिनिटांमध्ये बस येत असल्याने प्रवाशांना जास्त वेळ ताटकळत उभे राहावे लागले नाही. परंतु, बसच्या प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसमधून प्रवास करत असल्याने काहीसा त्रास प्रवाशांना झाल्याचे पाहायला मिळाले.

कॅबसेवाही पडली महागात...

सचिन सागरे 

कल्याण : मध्य रेल्वेच्या चार तासांच्या ब्लॉकच्या काळात कल्याण-डोंबिवलीदरम्यान एकही लोकल न धावल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. प्रवाशांच्या या गैरसोयीचा फायदा घेत रिक्षाचालक दुप्पट-तिप्पट भाडे मागू लागल्याने अनेकांनी ओला, उबेर या अ‍ॅपबेस्ड कॅबसेवेचा आधार घेतला. मात्र, ब्लॉककाळात कॅबना मागणी वाढल्याने त्यांचे भाडेही महागात पडल्याचे प्रवाशांनी सांगितले.
नाताळचा सण, विविध कार्यक्रम आणि सुटीमुळे बुधवारी सकाळपासून अनेक जण घराबाहेर पडले होते. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कारखाने, लघुउद्योग तसेच खाजगी कंपन्यांना सुटी नसल्याने तेथील कर्मचारी कामावर जाण्यासाठी निघाले. मात्र, लोकलसेवा नसल्याने ते सर्व जण ताटकळले. लोकलने मुंबई, ठाणे, दिवा परिसरातून डोंबिवलीत आलेल्या प्रवाशांनी एमआयडीसी अथवा कल्याणच्या दिशेने जाण्यासाठी बाजीप्रभू चौक गाठला. मात्र, तेथे केडीएमटीच्या बस तुडुंब भरून जात होत्या. तसेच रिक्षाचालक अव्वाच्यासव्वा भाडे मागत होते. यातून मार्ग काढण्यासाठी बहुतांश प्रवाशांनी ओला-उबेर अ‍ॅपचा आधार घेतला. त्यामुळे त्यांच्या कॅब, रिक्षांना मोठी मागणी होती.
मात्र, कल्याण आणि डोंबिवलीदरम्यान प्रवासासाठी ओला कंपनीच्या रिक्षाचे भाडे १६० रुपये, तर कॅबचे भाडे २४७ ते ३४० रुपये घेतले जात होते. हे भाडे अन्य वेळेपेक्षा जास्त असल्याचे प्रवाशांनी सांगितले. या कंपन्यांची पूर्ण सिस्टीम आॅटोमॅटीक असते. त्यामुळे ज्या परिसरात वाहतूक अधिक असेल किंवा मागणीत वाढ झाली असेल, तर त्यांचे भाडे वाढते, अशी माहिती ओलाच्या एका कॅबचालकाने दिली. त्यातच गाड्या कमी असल्याने भाड्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाल्याचेही सांगितले.

Web Title: Railway block at the root of the road traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.