रेल्वेपूल उभारणीचे काम जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:38 AM2021-03-08T04:38:11+5:302021-03-08T04:38:11+5:30
मुंब्रा : येथील रेतीबंदर परिसरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर लोखंडी पुलाच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. रविवारी सायंकाळी सहा ...
मुंब्रा : येथील रेतीबंदर परिसरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर लोखंडी पुलाच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत नियोजित कामाच्या जवळपास ९० टक्के काम पूर्ण करण्यात आले होते. मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशनअंतर्गत सुरू असलेल्या या लोखंडी पुलावरून रेल्वे गाड्या धावणार आहेत.
८० मीटर लांब आणि ११ मीटर उंचीच्या तसेच ३५५ टन वजनाच्या या लोखंडी पुलाच्या उभारणीच्या कामाला शनिवारी रात्री सुरुवात करण्यात आली. यासाठी या रस्त्यावरून तसेच मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक शनिवारी रात्री १२ वाजेपासून पूर्णपणे थांबवून, ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. दुचाकी, रिक्षा तसेच रुग्णवाहिकांसाठी येथील खाडीच्या बाजूने असलेल्या समांतर रस्त्याच्या बाजूने तात्पुरत्या स्वरूपाचा कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. नियोजित पुलाच्या ७० मीटर लांबीचे काम रविवारी सायंकाळपर्यंत पूर्ण केले होते. उर्वरित १० मीटर लांबीचे काम युध्दस्तरावर सुरू होते. तांत्रिक अडचणी न आल्यास रात्री १० वाजेपर्यंत उर्वरित १० मीटर लांबीचे कामही पूर्ण होईल, असा विश्वास मुंब्रा (उपविभाग) वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, पुलाच्या कामासाठी रस्ता वाहतुकीसाठी चोवीस तास बंद करणार असल्याची पूर्वसूचना देऊन वाहतूक विभागाने याबाबत जनजागृती केली होती. त्यामुळे मुंब्रा तसेच परिसरातील बहुतांश नागरिकांनी त्यांची खासगी वाहने रस्त्यावर आणली नव्हती.