रेल्वेच्या एक्स्प्रेस गाड्या फुल्ल, आरक्षण मिळेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:45 AM2021-09-12T04:45:38+5:302021-09-12T04:45:38+5:30
स्टार ११६३ अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : श्रावणापासून विविध सण, व्रत-वैकल्यांना सुरुवात झाली. आता गणेशोत्सव साजरा केला ...
स्टार ११६३
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : श्रावणापासून विविध सण, व्रत-वैकल्यांना सुरुवात झाली. आता गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पुढे नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण येऊ घातले आहेत. मागील दीड वर्ष कोरोनामुळे नागरिकांना हे सण-उत्सव साजरा करता आलेले नव्हते. मात्र, आता उपलब्ध असलेली लस आणि हळूहळू पूर्वपदावर येत असलेले व्यवहार पाहता नागरिकही सणांच्या निमित्ताने गावी अथवा नातेवाइकांकडे जाऊ लागले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या आता वाढली असून, दिवाळीपर्यंत अनेक मार्गांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण, उत्सवांवर निर्बंध आले होते. परंतु, मागील वर्षीच्या तुलनेत कोरोनाचे रुग्ण घटले आहेत. शिवाय, दोन लस घेतलेल्यांना राज्य सरकारने लोकलमधून प्रवासाला मुभा दिली आहे. त्यामुळे एकूणच आता नागरिकांचा लोकल प्रवास सुरू झाला आहे. मागील दीड वर्षात आपल्या नातेवाइकांकडे अथवा गावी जाऊ न शकलेली मंडळी आता रेल्वेच्या एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट आरक्षित करू लागली आहेत. मुंबई, ठाणे जिल्ह्यांतून नागरिक गोवा, कर्नाटक, चेन्नई, उत्तर प्रदेश, बंगळुरू याबरोबरच कोकणात जाण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे आतापासूनच दिवाळीपर्यंतच्या गाड्यांची तिकिटे आरक्षित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
-----------
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
दिवा-सावंतवाडी
राजधानी एक्स्प्रेस
हावडा मेल
मुंबई-नागपूर स्पेशल
दादर- चेन्नई स्पेशल
एलटीटी-नांदेड स्पेशल
मुंबई-सोलापूर स्पेशल
मुंबई-कोल्हापूर स्पेशल
पुष्पक एक्स्प्रेस
हैदराबाद स्पेशल
वांद्रे-बडोदा, अहमदाबाद मार्गावरील गाड्या
दिल्ली, सिमला मार्गावरील गाड्या
-----------------
उत्तर प्रदेश, चेन्नई गाड्यांसाठी वेटिंग
सध्या कमी अंतराच्या गाड्यांचे तिकीट मिळत नाही. लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट मिळत आहे. परंतु, त्यासाठी आरक्षण करावे लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेल्या कोकणात जाणाऱ्या पॅसेंजर आता गणपतीनिमित्त सुरू केल्या आहेत. मात्र, या गाड्यांचेही आरक्षित तिकीट दिले जात आहे. उत्तर प्रदेश, चेन्नई आदी भागांत जाणाऱ्या गाड्यांच्या तिकिटासाठी प्रवासी वेटिंगवर आहेत. काही प्रमाणात मोजकी तिकिटे ऑनलाइन दाखवत असली तरी क्षणार्धात ती वेटिंगवर जात आहेत. त्यामुळे प्रवासी मिळेल त्या गाडीचे तिकीट काढण्यावर भर देत आहेत.
---------------
पहाटे, रात्री उशिरा सुटणाऱ्या गाड्यांना प्राधान्य
हैदराबादकडे जाणाऱ्या गाड्यांना कमी गर्दी आहे. प्रत्यक्षात, मात्र सगळ्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल होत आहे. गाड्या जास्त प्रमाणात असल्या तरी त्यापैकी पहाटे आणि रात्री उशिराने सुटणाऱ्या गाड्यांमध्ये स्लीपर क्लासला एखाद्वेळी तिकीट मिळण्याची शक्यता आहे. पण सकाळी, दुपारी आणि मध्यरात्रीच्या आत मात्र गाड्यांना तिकीट मिळत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
------------
नियम पायदळी
रेल्वे प्रवासात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क या कोरोना नियमांचा फज्जा उडत आहे. सॅनिटायझरचा दावा रेल्वे करीत असली तरी प्रत्येक थांब्यावर त्याची अंमलबजावणी दिसून येत नाही. त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आहे. अजून कोविड गेलेला नाही, हे प्रशासन लक्षात का घेत नाही, असा सवाल प्रवासी करत आहेत.
------/------