रेल्वे प्रवाशांचीही साथ महत्त्वाची - राजेंद्र वर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:01 AM2019-04-28T00:01:44+5:302019-04-28T00:01:57+5:30

सर्वांच्या प्रयत्नांमुळे मिळाला ठाणे स्थानकास ‘बेस्ट स्टेशन’ पुरस्कार

Railway passengers along with important - Rajendra Verma | रेल्वे प्रवाशांचीही साथ महत्त्वाची - राजेंद्र वर्मा

रेल्वे प्रवाशांचीही साथ महत्त्वाची - राजेंद्र वर्मा

Next

पंकज रोडेकर

ठाणे -  १६ एप्रिल रोजी ठाणे-बोरीबंदर सेवेचा १६६ वा वर्धापन दिन ठाण्यात साजरा होत होता. त्यावेळी ठाणे रेल्वेस्थानकाला मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत ए-१ श्रेणीत स्वच्छतेचा ‘बेस्ट स्टेशन’ असा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार तब्बल १५ वर्षांनी पुन्हा ठाण्याला मिळाला आहे. या उपक्रमाबाबत ठाण्याचे स्टेशन डायरेक्टर राजेंद्र वर्मा यांच्याशी साधलेला संवाद.

दिवसेंदिवस वाढत्या प्रवासी संख्येत स्थानकाची स्वच्छता कशी ठेवता?
गर्दीच्या वेळेत, म्हणजे सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ६ ते १० या वेळेत विशिष्ट असा काही भाग सोडून स्थानकातील इतर ठिकाणची साफसफाई करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. गर्दीची वेळ निघून गेल्यावर जो परिसर स्वच्छ करण्याचा राहून जातो, तो स्वच्छ करण्यावर विशेष भर दिला जातो. कर्मचाऱ्यांसाठी आता हा नेहमीचाच सरावाचा भाग झाला आहे.

१० फलाट आणि इतर रेल्वे कार्यालयांच्या ठिकाणी साफसफाईसाठी किती जण आहेत?
गेल्या काही महिन्यांपूर्वी साफसफाईच्या कामांसाठी रेल्वेने ठेकेदाराची नेमणूक केली आहे. त्यानुसार, १५० कामगारांसह सातआठ प्रकारच्या वेगवेगळ्या मशीनही ठेकेदाराकडे आहेत. त्याद्वारे, तसेच स्थानकातील उपाहारगृहवाल्यांना त्यांच्या उपाहारगृहासमोरील स्वच्छता राखण्याबाबत सूचना केल्या आहेत. ते कमी पडले, तर ठेकेदाराद्वारे साफसफाई सुरूच असते.

स्वच्छ भारत अभियानाचा स्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी फायदा होतोय?
स्वच्छ भारत अभियानाचा या मोहिमेत निश्चितच फायदा झाला; पण तत्पूर्वीपासून स्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे रेल्वे प्रशासनाकडून नियमित प्रयत्न सुरू होते. ठेकेदाराची नेमणूक होण्यापूर्वी स्वच्छता राखण्यासाठी बाहेरून कर्मचारी बोलवले जात होते. आता स्वच्छतेचा ठेका दिल्याने स्थानक जास्त स्वच्छ ठेवले जात आहे.

अ‍ॅवॉर्ड मिळवण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून कधीच काम केले नाही; पण ठाणे स्थानकास स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला, याचा आनंद वाटतो. भविष्यातही स्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रवाशांनी या मोहिमेसाठी योगदान दिले, तर आपले रेल्वेस्थानक स्वच्छ आणि सुंदर राहील, यात शंका नाही.

‘गो ग्रीन आणि किप क्लीन’ ही संकल्पना ठाणे स्थानकात राबवण्याचे प्रशासनाने प्रयत्न आहेत. यासाठी प्रवाशांची साथ आवश्यक आहे. - राजेंद्र वर्मा

Web Title: Railway passengers along with important - Rajendra Verma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.