ठाण्यात रेल्वेची सुरक्षा भिंत पडली; वयोवृध्द पादचारी जखमी
By अजित मांडके | Published: June 28, 2024 02:51 PM2024-06-28T14:51:24+5:302024-06-28T14:51:39+5:30
ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ जवळील रेल्वेची सुरक्षा भिंत पडून एक जण जखमी झाल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक पंकज साळवी यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली.
ठाणे: चेंदणी कोळीवाडा, दत्त मंदिर रोड, या ठिकाणी असलेल्या पीर बाबा दर्गा येथील प्लॅटफॉर्म क्रमांक २ जवळील रेल्वेची सुरक्षा भिंत पडल्याची घटना शुक्रवारी दुपारी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास समोर आली. या घटनेत तिथून पाय जाणारे नरेंद्र कोळी (62) हे जखमी झाले असून त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाले आहे. तसेच त्यांना उपचारार्थ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, पडलेली सुरक्षा भिंत ही अंदाजे ६० फूट लांब व २० फूट उंच असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ जवळील रेल्वेची सुरक्षा भिंत पडून एक जण जखमी झाल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक पंकज साळवी यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महापालिका उपायुक्त शंकर पाटोळे, ठाणे रेल्वे स्टेशन मास्तर केशव तावडे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन अधिकारी - कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धोकापट्टी लावून बॅरीगेटिंग करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.