रेल्वेसेवा, मंदिरांबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच; नियमावलीचे काम सुरू- राजेश टोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 12:07 AM2020-11-11T00:07:03+5:302020-11-11T07:07:58+5:30
कल्याणमध्ये राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष नेमण्यासाठी कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत हे ऐकून घेण्यासाठी आलो आहे.
कल्याण : रेल्वेसेवा, मंदिरे उघडण्याचा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाऊ शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, असेही टोपे यांनी सांगितले. कल्याणमध्ये राष्ट्रवादीची बैठक व महापालिका हद्दीतील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री टोपे आले होते.
महापालिकेतील बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. दिवाळीनंतर कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे सेवा सुरू करण्याचा व मंदिरे उघडण्याचा निर्णय हा दिवाळीनंतरच घेतला जाऊ शकतो. सोशल डिस्टन्सिंग कसे पाळले जाईल, त्यासाठी नियमावली(एसओपी) तयार करावी लागेल. तसेच टास्क फोर्सने त्यावर काम सुरू केले आहे, असे टाेपे यांनी स्पष्ट केले.
कल्याणमध्ये राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष नेमण्यासाठी कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत हे ऐकून घेण्यासाठी आलो आहे. त्यानुसार पक्षश्रेष्ठींकडे अहवाल दिला जाईल. त्यानंतर कल्याण राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष नेमला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची चर्चा आहे, याविषयी टोपे यांच्याकडे विचारणा केली असता हा संपूर्ण निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे, असे ते म्हणाले.
बिहारचे निकाल पाहता लोकांची सरकारविरोधात जी नाराजी होती, ती स्पष्ट दिसून आली आहे. तेजस्वीसारख्या तरुणाने बिहारमध्ये एकाकी लढत दिली. लालूप्रसाद यादव हे तुरुंगात असताना तेजस्वीची लढत ही कौतुकास्पद आणि अभिनंदनास पात्र आहे, अशी प्रतिक्रिया बिहार निकालासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.