अंबरनाथ-बदलापूर मार्गावरील अपघातानंतर सहा तासांनी रेल्वे सेवा पूर्ववत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 11:10 AM2021-01-27T11:10:13+5:302021-01-27T11:10:34+5:30
अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना ट्रॅकचे मेंटेनन्स करणाऱ्या टीआरटी मशीनमध्ये बिघाड झाल्याने मशीन खाली सापडून 36 वर्षीय राजू जगडे या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. तर या अपघातात वासुदेव भावदू सिद, गणेश किशन सिद हे जखमी झाले.
अंबरनाथ:अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळाखालील स्लीपर बदलणाऱ्या यंत्रामध्ये बिघाड झाल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली होती. या यंत्राखाली चिरडून एका कामगाराचा मृत्यू झाला होता, तर 2 कामगार जखमी झाले होते. पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. यानंतर रेल्वे प्रशासनाने हे यंत्र हटविण्याचे काम हाती घेतले होते. ते काम सकाळी साडेनऊ वाजता पूर्ण झाल्यानंतर बदलापूरहून 09:52 ची पहिली लोकल रवाना झाली.
अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना ट्रॅकचे मेंटेनन्स करणाऱ्या टीआरटी मशीनमध्ये बिघाड झाल्याने मशीन खाली सापडून 36 वर्षीय राजू जगडे या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. तर या अपघातात वासुदेव भावदू सिद, गणेश किशन सिद हे जखमी झाले.
अपघातानंतर बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी आणि मुंबईहून बदलापूरला जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली होती. अपघाताच्या काही कालावधीनंतर बदलापूरहून मुंबईच्या दिशेने रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. मात्र, मुंबईहून कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली होती. अखेर रेल्वे प्रशासनाने सकाळी क्रेन मागवत बिघाड झालेले टीआरटी मशीन बाजूला सरकवत रेल्वे सेवा पूर्ववत केली.