ठाणे जिल्ह्यातील २२ लाख चाकरमान्यांची रेल्वेकडून उपेक्षा; लॉकडाऊनच्या संधीचं सोनं केलं नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 02:27 AM2021-01-26T02:27:49+5:302021-01-26T02:28:27+5:30
अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०१२ पासून कागदावरच
अनिकेत घमंडी
डोंबिवली : मध्य रेल्वे प्रशासनाला २०१२ पासून सुरू असलेले अनेक प्रकल्प दशकअखेर पूर्ण करून २२ लाख चाकरमानी असलेल्या ठाणे जिल्ह्याला दिलासा देता आलेला नाही. त्यात प्रामुख्याने पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गासह कळवा-ऐरोली लिंक रोडच्या कामाचा समावेश आहे. रेल्वे सेवेवरील ताण हे काही प्रकल्प पूर्ण न होण्याचे कारण दिले जात होते. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये उपनगरीय रेल्वे सेवा बंद असल्याचा लाभ घेऊन रेंगाळलेले प्रकल्प पूर्ण करणे शक्य होते. मात्र ती संधी रेल्वे प्रशासनाने गमावली आहे.
‘नेमेची येतो मग पावसाळा’ यासारखेच आगामी वर्षाच्या रेल्वे अर्थसंकल्पाच्या तोंडावर आतापर्यंतच्या प्रकल्पांचा आढावा घेता प्रवाशांच्या पदरी केवळ निराशाच येणार आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे २२ मार्चपासून भारतभर रेल्वे बंद झाली. सामान्यांची जीवनवाहिनी समजली जाणारी उपनगरीय लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मुंबई परिसरात सुरू झाली असली तरीही गेले आठ महिने राज्य, केंद्र, रेल्वे प्रशासन यांच्यातील वैचारिक संघर्षात सामान्यांना मात्र २६ जानेवारीपर्यंत लोकल सेवा सुरू झालेली नाही. हजारो नागरिकांना वेळखाऊ रस्ते वाहतुकीच्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र तरीही रखडलेले प्रकल्प मार्गी लागलेले नाहीत. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन या संस्थेसह रेल्वे प्रशासनाकडून विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. पण दोन्ही यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत असल्याने संवादाच्या अभावी प्रवाशांच्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याचे वास्तव आहे.
रेल्वेद्वारे ‘मालवाहतूक’ सुरू असल्याने २३ मार्च ते १७ डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वेने ७.७१ लाख वॅगन्समधून ४०.८५ दशलक्ष टन मालवाहतूक व १.७६ लाख टन पार्सल वस्तूंची वाहतूक केली. त्यामध्ये भिवंडी रोड येथील गुड्पार्सल या नव्या प्रकल्पाचे योगदान विशेष उल्लेखनीय असल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्रवासी नसले तरी रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसलेला नाही.
गर्दी विभागण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल नाहीच
सुमारे ४२५ कोटी रुपये खर्चाचा बदलापूर, टिटवाळा येथून मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या १५ डबा लोकलचा प्रस्ताव रेल्वे दरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात येत आहे. कोपर, अंबरनाथ, बदलापूर, आसनगाव स्थानकातील होम प्लॅटफॉर्मची कामे रेंगाळलेली आहेत. २०१२ मध्ये माजी खासदार आनंद परांजपेंच्या मागणीने सुरू झालेल्या लोकल फेरीत ८ वर्षात अवघा एक रेक वाढवण्यात आला.
पाचव्या-सहावा ट्रॅक कधी पूर्ण होणार?
ठाणे-दिवा पाचवी-सहावी लाइन २०१४ पासून खोळंबलेली असल्याने कल्याण-ठाणे भागात चाकरमान्यांच्या लोकलमधील गर्दीमुळे पडून अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच या पट्ट्यात रूळ ओलांडून
होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही चिंताजनक आहे.