पंचांग सांगतेय, आजपासून पाऊस; दा. कृ. सोमण यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 07:57 AM2023-06-08T07:57:44+5:302023-06-08T07:59:45+5:30
सर्वसाधारणपणे सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला की, आपल्याकडे पावसाळ्याला सुरुवात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : सर्वसाधारणपणे सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला की, आपल्याकडे पावसाळ्याला सुरुवात होते. गुरुवारी सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे ८ जूनपासून पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
१५ दिवस मृग नक्षत्रात जास्त पाऊस पडेल. मात्र, वेधशाळेचे भाकीत जास्त वैज्ञानिक निकषांवर आधारित असते, असे सोमण यांनी सांगितले. मृग नक्षत्राचे वाहन हत्ती आहे. ज्यावेळी वेधशाळा नव्हत्या, कृत्रिम उपग्रह नव्हते. त्यावेळपासून शेतकरी पंचांगातील पर्जन्य नक्षत्र वाहनांवरून पावसाचा अंदाज जाणून घ्यायचे. हे अंदाज कधी बरोबर यायचे तर कधी चुकायचे. आता आधुनिक वेधशाळांचे अंदाज अचूक येतात, असे सोमण यांनी सांगितले.
यंदाचा सूर्यनक्षत्र प्रवेश आणि वाहने पुढीलप्रमाणे आहेत.
- मृग - गुरुवार, ८ जून सायंकाळी ६:५२ वाहन हत्ती
- आर्द्रा - गुरुवार, २२ जून, सायंकाळी ५:४७, वाहन मेंढा
- पुनर्वसू - गुरुवार, ६ जुलै, सायंकाळी ५:२५, वाहन गाढव
- पुष्य - गुरुवार, २० जुलै, सायंकाळी ४:५४, वाहन बेडूक.
- आश्लेषा - गुरुवार, ३ ॲागस्ट, दुपारी ३:५१, वाहन म्हैस.
- मघा- गुरुवार, १७ ॲागस्ट, दुपारी १:३२, वाहन घोडा.
- पूर्वा फाल्गुनी - गुरुवार, ३१ ॲागस्ट, सकाळी ९:३०, वाहन मोर.
- उत्तरा फाल्गुनी- बुधवार, १३ सप्टेंबर, उत्तररात्री ३:२४, वाहन हत्ती.
- हस्त - बुधवार, २७ सप्टेंबर सायंकाळी ६:५४, वाहन बेडूक.
- चित्रा - बुधवार, ११ ऑक्टोबर, सकाळी ७:५८, वाहन उंदीर.
- स्वाती - मंगळवार, २४ ऑक्टोबर सायंकाळी ६:२५, वाहन घोडा.