Rain In Thane: ठाणे शहरात पावसाची जोरदार बॅटिंग, झाडे पडली, भिंती कोसळल्या, मोठ्या प्रमाणात वित्तहानी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 12:52 PM2022-07-05T12:52:26+5:302022-07-05T12:55:22+5:30

Rain In Thane: एकीकडे हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज गेल्या चोवीस तासांपासून ठाणे शहरात पाहण्यास मिळत आहे. शहरात सोमवारी दुपारपासून पावसाने धुवाधार बॅटिंग सुरुवात केली, ती मंगळवारी सकाळपर्यंत सुरूच होती.

Rain In Thane: Heavy rains battered Thane, trees fell, walls collapsed, huge financial loss | Rain In Thane: ठाणे शहरात पावसाची जोरदार बॅटिंग, झाडे पडली, भिंती कोसळल्या, मोठ्या प्रमाणात वित्तहानी

Rain In Thane: ठाणे शहरात पावसाची जोरदार बॅटिंग, झाडे पडली, भिंती कोसळल्या, मोठ्या प्रमाणात वित्तहानी

Next

ठाणे - एकीकडे हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज गेल्या चोवीस तासांपासून ठाणे शहरात पाहण्यास मिळत आहे. शहरात सोमवारी दुपारपासून पावसाने धुवाधार बॅटिंग सुरुवात केली, ती मंगळवारी सकाळपर्यंत सुरूच होती. सुदैवाने या पावसात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, वित्तहानी काही प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. तसेच शहरात दोन पडलेल्या सरंक्षण भिंतींच्या घटनांमध्ये एक जण जखमी झाला आहे. विशेष म्हणजे पाऊस असो या नसो शहरात झाडे पडण्याच्या घटना नित्यनियमाने सुरू आहेत. तर चोवीस तासात पाच झाडे कोसळली असली तरी या पावसामुळे दहा सखल भागात पाणी साचल्याचे चित्र पुढे आले. शहरात १४६.०२ मिमी पाऊस पडल्याची नोंद चोवीस तास झाली असून मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम असल्याने पहिल्या दोन तासात २०.३१ मिमी पाऊस पडला आहे.

सोमवारी दुपारच्या सुमारास पावसाने जोर धरला. पहिल्या एक तासात २४.८९ मिमी पावसाची ठाणे शहरात नोंद झाली आहे. त्यानंतर पावसाने आपले बरसणे सुरूच ठेवले होते. यातच रात्रभर पाऊस सूरुच होता. ४ जुलै सकाळी ८.३० वाजल्यापासून ते ५ जुलै सकाळी ८.३० वाजेपर्यंत शहरात १४६.०२ मिमी पावसाची नोंद झाली तर आतापर्यंत ५९१.३५ मिमी पडल्याची नोंद आहे. मंगळवारी सकाळी पावसाचे बरसणे सुरूच असल्याने बहुतांशी शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या होत्या. सकाळी ८.३० ते ९.३० वाजेपर्यंत १५.४९ मिमी पाऊस झाला आहे.

एकीकडे पावसाची बॅटींग धुवाधार सुरु असताना, दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षेचा फोनही खणखणत होता, हॅलो बोलण्याची खोटी, साहेब झाडे पडले, कुठे भिंत कोसळली आहे. तर साहेब पावसाचा जोर वाढल्याने अमुक ठिकाणी पाणी साचले आहे किंवा साचण्यास सुरु झाली आहे. असे तब्बल ३६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक १०तक्रारी ह्या पाणी साचण्याच्या आहेत. ०९ तक्रारी इतर असून झाडांच्या फांदया तुटून पडल्या आहेत. त्या पाठोपाठ ५ ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. दोन ठिकाणी आग तसेच भिंत कोसळल्याच्या ही दोन घटना घडल्या आहेत. अशा तक्रारींचे स्वरूप आहे. 

ही आहेत पाणी साचण्याच्या ठिकाणे
कोपरी कन्हैयानगर , कोपरी केदारेश्वर वाडी या ठिकाणी पाणी साचले. वागले इस्टेट साठे नगर येथील गणेश चाळीजवळ पाणी साचले. पोलीस लाईन सी पी ऑफिसच्या मागील चाळीजवळ पाणी साचले.तसेच घोडबंदर रोडवरील कासारवडवली,आदर्श विद्यामंदिर येथील रस्त्यावरही पाणी साचले. त्याचबरोबर, पारसिकनगर शंकर मंदिर जवळील बुबेरा चाळी जवळ पाणी साचले होते.

कोसळलेल्या भिंतीमुळे एक जण जखमी; तेथील नागरिकांचे स्थलांतर
शहरातील वंदना एसटी विभागीय कार्यालयाची सुरक्षा भिंत दोन घरांवर कोसळून गोपाळ पांचाळ (५८) हे जखमी झाला आहेत. या घटनेत दोन घरांचे पत्रेही फुटून नुकसान झाले आहे.तर, चार घरे खाली करण्यात आली असून उथळसर प्रभाग समिती मार्फत स्थलांतर केले गेले आहे. तसेच मुंब्रा, दत्तवाडी येथील अनिल भगत चाळीची सुरक्षा भिंत कोसळली. या चाळीमध्ये एकूण १९ खोल्या होत्या त्यामधील दोन खोल्या रिकामी होत्या व १७ खोल्यांमध्ये रहिवासी राहत होते. त्या १९ खोल्या मुंब्रा प्रभाग समिती अतिक्रमण विभागामार्फत रिकाम्या करून सील करण्यात आल्या आहेत व तेथील रहिवाशांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था मुंब्रा स्टेशन जवळ ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ७७  येथे करण्यात आली आहे.या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.

ठाण्यात भर पावसात कारला आग 
भर पावसात घोडबंदर रोडवरून ठाण्याकडे येणाऱ्या वाहिनीवरती गायमुख गावाजवळ अचानक सोमवारी रात्री एका कारमधून धूर येऊ त्या कारला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी माहिती मिळताच धाव घेऊन त्या आगीवर नियंत्रण मिळविले.यामध्येही कोणालाही दुखापत झालेली नाही. 

Web Title: Rain In Thane: Heavy rains battered Thane, trees fell, walls collapsed, huge financial loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.