भिवंडी शहरात पावसाचा धुमाकूळ, भाजी मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चौकासह अनेक घरांमध्ये शिरले पाणी...
By नितीन पंडित | Published: July 14, 2024 07:21 PM2024-07-14T19:21:16+5:302024-07-14T19:21:51+5:30
भाजी मार्केट,छत्रपती शिवाजी महाराज चौक, नजराणा सर्कल या परिसरात अडीच ते तीन फुटा पर्यंत पाणी शिरल्याने शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता बंद पडला होता. नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून आपली वाट काढावी लागत होती.
भिवंडी: शहरात रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहरात हाहाकार उडवलेला आहे.शहरातील मुख्य भाजी मार्केट,बाजारपेठ, तीनबत्ती,नजराणा सर्कल,छत्रपती शिवाजी महाराज चौक यासह ईदगाह झोपडपट्टी, कामवारी नदीकिनारी म्हाडा कॉलनी चाविंद्रा रस्ता,काकू बाई चाळ ,देवजी नगर या संपूर्ण परिसरात पाणी साचले होते. भाजी मार्केट,छत्रपती शिवाजी महाराज चौक, नजराणा सर्कल या परिसरात अडीच ते तीन फुटा पर्यंत पाणी शिरल्याने शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता बंद पडला होता. नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून आपली वाट काढावी लागत होती.
खाडी किनारी असलेल्या ईदगाह या झोपडपट्टी मध्ये चार फुटा पर्यंत साचल्याने झोपडपट्टीतील सर्वच घरांमध्ये पाणी शिरले आहे. सकाळ पासून येथील पूरजन्य परिस्थिती असताना भिवंडी महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन या ठिकाणी नागरिकांच्या मदतीसाठी आलेले नव्हते तर ईदगाह झोपडपट्टी या भागात नागरिकांना जेवणाचे पाकीट अथवा अत्यावश्यक सेवा सुध्दा पालिका प्रशासनाने न पुरविल्याने येथील स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहरालगत वाहणाऱ्या कामवारी नदीच्या पातळीत सुद्धा वाढ झाली असून जर पावसाचा जोर वाढत राहिलास पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्ती केली जात आहे.