ठाणे जिल्ह्यात पावसाची रिपरिप; जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 08:05 PM2021-08-19T20:05:51+5:302021-08-19T20:07:28+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत ९३ टक्के म्हणजे १७००.७ मिमी पाऊस पडला आहे.
ठाणे: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांत सरासरी २७.७ मिमी पाऊस पडला. याशिवाय धरण क्षेत्रातही पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ९३ टक्के म्हणजे १७००.७ मिमी पाऊस पडला आहे. आज ठाणे शहर परिसरात ३९.७ मिमी, कल्याण २७.४, मुरबाडला २०.८, भिवंडीत २३.३, शहापूर २७.८, उल्हासनगरमध्ये २५.३ आणि अंबरनाला २२ मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. शहरांसह मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोटात उत्तम पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाणी साठा वाढला आहे. बारवी धरणात ८४.२० टक्के पाणी साठा आजच्या दिवशी झाला आहे. या धरणाच्या पाणलोटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे.
जिल्ह्यातील सर्व महानगरांना व एमआयडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या बारावीच्या खानिवरे या पाणलोटात आज १४ मिमी, कान्होळला ३३ मिमी, पाटगावला १७ मिमी आणि ठाकूरवाडी या पाणलोटात १७.१० मिमी, तर बारवी धरणात आज सरासरी १० मिमी पाऊस पडला आहे. यामुळे धरणांतील पाणी साठा ८४.२० टक्केने वाढला आहे. याप्रमाणेच भातसा धरणात ८४.७२ टक्के, आंध्रात ६६.११ टक्के पाणी साठा आजपर्यंत झाला आहे.