पाऊस भागवतोय तहान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 03:37 AM2018-07-16T03:37:05+5:302018-07-16T03:37:07+5:30
गेल्या काही महिन्यांपासून येथे पाणीटंचाई भेडसावत असल्याने त्यांना पावसाच्या पाण्याचा आधार घ्यावा लागला आहे.
प्रशांत माने
कल्याण : एकीकडे धोधो पाऊस बरसत असला तरी पिण्याच्या पाण्यासाठी आडिवली-ढोकळीतील रहिवाशांची वणवण सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथे पाणीटंचाई भेडसावत असल्याने त्यांना पावसाच्या पाण्याचा आधार घ्यावा लागला आहे. मात्र, दुसरीकडे बेकायदा ढाबे आणि वाहने धुणाऱ्या सर्व्हिस सेंटरला मुबलक पाणी मिळत आहे.
आडिवली-ढोकळी हा भाग २७ गावांमध्ये येतो. १ जून २०१५ ला २७ गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झाली. परंतु, आजही तेथील पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागलेली नाही. या टंचाईप्रकरणी मंत्रालयदरबारी अनेक बैठका झाल्या. पाणीप्रश्न सोडवण्याकरिता अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याची मागणीही मान्य करण्यात आली. त्यात या गावांमध्ये नवीन जलवाहिन्या टाकण्याचे कामही हाती घेण्यात आले. परंतु, काही ठिकाणी ते पूर्ण न झाल्याने तेथील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे. मात्र, बिनदिक्कतपणे उभे राहिलेले बेकायदा ढाबे, सर्व्हिस सेंटर, हॉटेल यांना मात्र पाणी मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नांदिवली आणि आडिवली-ढोकळी प्रभागात हे चित्र सर्रास पाहावयास मिळत आहे.
कल्याण-डोंबिवली पालिकेचा १०८ क्रमांकाचा प्रभाग असलेल्या आडिवली-ढोकळीमध्ये तर पाच महिन्यांपासून या ठिकाणच्या रहिवाशांना पाणीटंचाईच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरद्वारे पाणी मिळत होते. मात्र पावसाळ्यात तो बंद झाल्याने रहिवाशांवर पावसाचे पाणी गाळून-उकळून पिण्याची नामुश्की ओढवली आहे. मध्यंतरी, रहिवाशांनी टंचाईप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयावर आंदोलनही छेडले होते. परंतु, आजवर केवळ आश्वासन देऊन प्रशासनाने दिशाभूल केल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. यासंदर्भात बराच पाठपुरावा केला, पण आजमितीला पाणीसमस्या कायम असल्याचेही आडिवली-ढोकळीतील रहिवाशांचे म्हणणे आहे.
>आचारसंहितेमुळे लागला विलंब
आडिवली-ढोकळी प्रभागातील पाण्याची समस्या पाहता तेथे नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाची निविदा मंजूर झाली आहे. परंतु, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने काम सुरू करण्यात आले नव्हते. परंतु, आता आचारसंहिता संपुष्टात आल्याने लवकरच या कामाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या कामामुळे पाण्याची समस्या निकाली निघेल, अशी प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिली.
वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही शून्य : पाऊस पडत असताना पिण्याच्या पाण्याचे कमालीचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी पिण्याची वेळ आमच्यावर आली आहे. पाच महिन्यांपासून पाणीटंचाई भेडसावत आहे. केडीएमसीकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही आजवर झालेली नाही, असे रहिवासी अशोक पालवे यांनी सांगितले.