ठाणे जिल्ह्यात चार दिवस पाऊस थंडवणार; तानसाचे ११ तर मोडक सागरचे दोन दरवाजे उघडले
By सुरेश लोखंडे | Published: July 28, 2023 06:43 PM2023-07-28T18:43:50+5:302023-07-28T18:43:59+5:30
ठाणे जिल्ह्यात संततधार सुरू असलेला पाऊस आता पुढील पाच दिवस थंडवणार आहे.
ठाणे : जिल्ह्यात संततधार सुरू असलेला पाऊस आता पुढील पाच दिवस थंडवणार आहे. मात्र आतापर्यंत पडलेल्या संततधार पावसामुळे तानसा पाठोपाठ मोडक सागरही भरले आहे. या दोन्ही धरणांचे अनुक्रमे ११ व दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. या धरणांसह बारवी धरणा खालील गांवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. बारवी धरणात सध्या ९१ टक्के पाणी साठा तयार झालेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण भरण्याची दाट शक्यता आहे.
जिल्ह्यातील पावसाचा शुक्रवारी ऑरेंज अलर्ट होता. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. मात्र पुढील तीन दिवस एलो अलर्ट असून एक दिवस ग्रीन अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. त्यामुळे तब्बल महिन्याभरापासून सुरू असलेला पाऊस आता काही दिवस थंडवणार असल्याचा आंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात कमी अधीक पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक अंबरनाथला सरासरी३१.३८ मिमी., भिवंडीला १४.३३ मिमी, कल्याणला २६.३० मिमी, मुरबाडला २७.१० मिमी, शहापूरला २७.२५मिमी. आणि ठाणे तालुक्यात २३.२९ मिमी. पाऊस सकाळपासून सायंकाळपर्यंत पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. धरणांच्या पाणलोटातही पावसाचा जोर कायम आहे. मोडक सागर भरल्यामुळे आता या धरणातून पाच हजार २२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर तानसा धरणातून १२ हजार १०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. बारवी धरण कोणत्याही क्षणी भरण्याच्या स्थितीत आहे.
तलावांमधील पाणी साठा -
धरणाचे नाव - साठा दलघमीमध्ये- टक्के
- भातसा - ६४९.६६ - ६८.९६ टक्के
- अ.वैतरणा -१९९.६३- ६०.२५
- आंध्रा - २३१.१२ - ६८.१५
- मो.सागर - १२८.९३- १००
- तानसा - १४४.४८- ९९.५८
- म.वैतरणा- १५४.२५- ७९.७०
- बारवी - ३११.३१- ९१.४३