ठाण्यात पावसाची कोसळधार, १४८. ५७ मिमी पावसाची नोंद; २० हून अधिक सखल भागात साचले पाणी
By अजित मांडके | Published: June 28, 2023 06:11 PM2023-06-28T18:11:09+5:302023-06-28T18:11:39+5:30
ठाण्यात यंदाच्या वर्षीही नालेसफाई आणि गटार सफाईची पोल खोल पावसाने केली आहे. या मुसळधार पावसामुळे ठाण्यातील विविध परिसरात पाणी भरल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यात मंगळवारी सांयकाळ पासून जोर धरलेल्या पावसाने बुधवारी देखील दमदार हजेरी लावली. परंतु या जोरदार झालेल्या पावसाने ठाणे महापालिकेच्या नालेसफाई आणि गटार सफाईची पुर्ती पोलखोल केल्याचे दिसून आले. शहरातील २० हून अधिक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. त्यातही सकाळच्या पहिल्या पाच तासातच ठाण्यात १०५ मीमी पावसाची नोंद झाली. तर सांयकाळ पर्यंत शहरात १४८.५७ मिमी पावसाची नोंद झाली. अनेक सखल भागात पाणी साचले होते. कळवा, मुंब्रा, घोडबंदर, दिवा भागातही अनेक ठिकाणी दुकानात घरात पाणी शिरल्याचे दिसून आले. तसेच काही ठिकाणची बत्ती ही गुल झाली होती. याशिवाय शहरातील झाड आणि त्याच्या फांदया तुटून पडल्या. याचबरोबर सुरक्षा भिंत ही एका ठिकाणी कोसळली आहे. या घटनांमध्ये सुमारे ०५ वाहनांचे नुकसान झाले मात्र कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
बुधवारी सकाळपासून ८.३० वाजल्यानंतर पावसाने सुरुवात केली. पहिल्या तीन तासात पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने ४९.८१ मिमी नोंद झाली. त्यानंतर दोन तास पाऊस सुरू होता. मात्र साडेबारा ते दीडच्या दरम्यान आणखी रुद्र रुषधारण केल्याने अवघ्या एक तासात ४३.१८ मिमी नोंदवला गेला. याशिवाय प्रकारे दुपारी दीड वाजेपर्यंत १०५.१६ मिमी झाल्याची नोंद ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षेत झालेली आहे. या पाच तासांच्या पावसाने ठाणे शहराला चांगले वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या बाजूच्या गटारातील पाणी चक्क रस्त्यावर आल्याने शहराला गटार गंगेचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे सकाळच्या सुमारास नोकरीवर जाणाऱ्या चाकरमान्यांची मात्र दाणादाण उडालेली पाहायला मिळाली आहे. सकाळच्या सुमारास तारेवरची कसरत करून चाकरमान्यांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागला. तर शहरात झाडांसह सुरक्षा भिंत आणि दरड कोसळल्याची घटना समोर आली.
या ठिकाणी साचले पाणी
ठाण्यात यंदाच्या वर्षीही नालेसफाई आणि गटार सफाईची पोल खोल पावसाने केली आहे. या मुसळधार पावसामुळे ठाण्यातील विविध परिसरात पाणी भरल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. ठाण्यातील वंदना सिनेमा परिसर, खारकर आळी परिसर, जांभळी नाका परिसर, कॅसरमिल, कळवा पूर्व, मुंब्रा, दिवा, वागळे इस्टेट या ठिकाणी सखल २० भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पाहायला मिळाले आहे.
या भागात वृक्ष पडले
या मुसळधार पावसामुळे वागळे इस्टेट, कळवा येथील गणपती पाडा, खोपट, मासुंदा तलाव याभागात वृक्ष उन्मळून पडले. तर कोपरी, सर्व्हिस रो लुईसवाडी याठिकाणी झाडाच्या फांद्या गळून पडल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
वृंदावन भागात पाणीच पाणी
वृदांवन भागातील इमारतींच्या परिसरात पाणी साचू नये यासाठी महापालिकेच्या माध्यमातून मागील वर्षी काही उपाय करण्यात आले होते. परंतु यंदाच्या पावसाने त्यांचे हे उपाय फोल ठरविल्याचे दिसून आले. वृदांवन भागातील अनेक इमारतींच्या ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले.
कळव्यात तलावातील पाणी बाहेर
कळव्यातील नालेसफाई पूर्ण न झाल्यामुळे कळव्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मात्र अशातच ठाण्यातील कळवा पूर्व परिसरात चक्क तलावाचे पाणी बाहेर आले. त्यासोबतच तलावातील मासे व कासव देखील आता रस्त्यावर दिसून आले.