कल्याण तालुक्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:15 PM2019-08-04T23:15:24+5:302019-08-04T23:15:34+5:30
भातसा, काळू, उल्हास नद्यांना पूर : शेकडो घरे पाण्याखाली
टिटवाळा : कल्याण तालुक्यातील भातसा, काळू व उल्हास या तिन्ही नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणच्या चाळी पाण्याखाली गेल्या असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. खडवली नदीकाठच्या इंदिरानगर, जू गाव, आदिवासी आश्रमशाळा परिसर, स्वामी समर्थ मठ परिसर येथील ७० ते ८० घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. जू गावातील ५८ जणांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात आली.
खडवलीतील भातसा नदीला पूर आल्याने नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने खडवली-पडघा वाहतूक ठप्प झाली आहे. खडवली नदीकाठच्या इंदिरानगर, जू गाव, आदिवासी आश्रमशाळा परिसर, स्वामी समर्थ मठ परिसर येथील ७० ते ८० घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पहाटे ४ वाजता रहिवासी साखरझोपेत असताना घरात पाणी शिरायला सुरुवात झाली. यामुळे त्यांना घरातील सामानही इतरत्र हलवता आले नाही. ग्रामस्थांनी त्यांना सुरक्षितस्थळी हलवले. तसेच त्यांच्या निवाऱ्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था केली.
भातसा नदीलगतच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली. जू गावाला पुरामुळे पाण्याचा वेढा पडला होता. यामुळे तेथे अडकलेल्या ५८ जणांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफचे पथक खडवलीत दाखल झाले. हेलिकॉप्टरद्वारे त्यांची सुटका करण्यात आली.
रुंदेजवळील काळू नदीवरील पुलावर शनिवारपासूनच पाणी आहे. त्यामुळे १० ते १२ गावे संपर्काबाहेर आहेत. तसेच याच काळू नदीवर वासुंद्री गावाजवळील पूलही शनिवारपासून पाण्याखाली असल्याने सांगोडा, कोंढेरी, मोस, वासुंद्री व निंबवली या गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या १५ दिवसांपासून तेथील ग्रामस्थ या पावसाच्या पुराचा फटका सहन करत आहेत.
टिटवाळा रेल्वेस्थानक ते गणपती मंदिर या रस्त्यावर शिव मंदिरालगत असणाºया पुलावरून पाच ते सहा फूट काळू नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, टिटवाळा मंदिर परिसरातील लोक पलीकडे, तर रेल्वेस्थानक परिसरातील नागरिक अलीकडे अडकून पडले आहेत. पाणी तुंबल्याने नारायणनगर रोडवरील गणेशकृपा चाळीतील २५ घरे पाण्याखाली आहेत. तर, सांगोडा रोड येथील २०० खोल्या पाण्याखाली गेल्या होत्या. ‘रिजन्सी सर्वम’ या सोसायटीतही पाणी शिरल्याने तेथील रहिवासी भयभीत झाले आहेत. या सोसायटीच्या काही इमारती व क्लब हाउस हे नाल्याच्या कडेला असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले.
टिटवाळा स्थानकातील रेल्वेरूळांमध्ये पाणी असल्याने रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. या ठिकाणी स्थानिक पोलीस, नागरिक व सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते लोकांना मदतीचा हात देताना दिसत आहेत. विनायक आणि गजानन काळण यांनी आपल्या होड्यांद्वारे नागरिकांना येजा करण्यासाठी मदत केली.
बारवी धरणाचे पाणी सोडल्याने आणखी पूरसदृश परिस्थिती निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. पुराचे पाणी बघण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली. पूरसदृश परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना येथील विद्यामंदिर शाळेत हलवले असून, तेथे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्थानिक नगरसेविका व उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी केली आहे.
प्रस्तावित डम्पिंगची जागा पाण्याखाली
मांडा-टिटवाळा येथील सांगोडा रोडलगतच्या स्मशानभूमी परिसरात पावसाचे पाणी शिरल्याने येथील चाळींतील २०० ते ३०० घरे पाण्याखाली गेली आहेत. मात्र, याच ठिकाणी केडीएमसी डम्पिंग ग्राउंड उभारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याविरोधात येथील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलनही छेडले होते.
दरम्यान, तीच जागा सध्या काळू नदीला पूर आल्यामुळे पाण्याखाली गेली आहे. थोडी जरी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, तरी हा परिसर पाण्याखाली जातो. यंदा १५ दिवसांत तीन वेळा ही जागा पाण्याखाली गेली? त्यामुळे अशा जागी महापालिका डम्पिंग ग्राउंड उभारून काय साध्य करणार आहे, असा सवाल केला जात आहे.