पावसामुळे तरुणाईचा कल टेम्पररी टॅटूकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:06 AM2019-09-25T00:06:43+5:302019-09-25T00:06:46+5:30
नवरात्रोत्सवामुळे फॅड वाढले : मुलांमध्ये नावाच्या, तर मुलींमध्ये राधा - कृष्णाची क्रेझ
ठाणे : नवरात्रोत्सवात अंगावर टॅटू काढण्याचे फॅड वाढतच आहे. सौंदर्यात भर पाडण्यासाठी हल्ली टॅटूकडे तरुणाईचा जास्त कल आहे. गरबा खेळायला येणारे तरुण, तरुणी हमखास टॅटू काढून घेतात. कायमस्वरुपी काढण्यात येणाऱ्या टॅटूला सुकण्यास वेळ लागत असल्याने, तात्पुरत्या टॅटू काढण्याला तरुणाईने पसंती दिली आहे. गेल्यावर्षी या उत्सवाच्या निमित्ताने भूमिती आकाराच्या टॅटूची क्रेझ होती. यावर्षी मुलींमध्ये राधा - कृष्ण, तर मुलांमध्ये नावांच्या टॅटूची क्रेझ असल्याचे टॅटू आर्टिस्टने सांगितले.
तरुणाईच्या पेहरावाबरोबर सौंदर्याला ग्लॅमर देणाºया टॅटूचे फॅड नवरात्रीत वाढले असल्याचे अलिकडे पाहायला मिळत आहे. आपल्या पेहरावाबरोबर सौंदर्यही चारचौघांत खुलून दिसावे, यासाठी गरबाप्रेमींची आठवडाभर धावपळ सुरू असते. यात अंगावर गोंदवून घेणे हा प्रकार भारतात जुना असला तरी, याच्या मेकओव्हरमुळे ग्लॅमर प्राप्त झाले आणि हा प्रकार ‘टॅटू’ म्हणून सर्वश्रूत झाला. दरवर्षी वेगवेगळ्या टॅटूची क्रेझ तरुणाईमध्ये दिसून येते. परंतू पावसामुळे तात्पुरत्या टॅटू काढण्याकडे तरुण वर्ग वळला आहे. कायमस्वरुपी टॅटू सुकायला १० ते १५ दिवस लागतात. पण गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे वातावरणात थंडावा असल्याने कायमस्वरुपी टॅटू सुकणे कठिण आहे. त्यात अवघे सहा दिवस राहिल्याने तरुणाईने तात्पुरत्या टॅटू काढण्यालाच पसंती दिली आहे. आठवडाभरावर हा उत्सव आल्याने गरबाप्रेमींनी आपल्या मनपसंतीचे टॅटू काढून घेण्यास सुरूवात केली आहे. या काळात गर्दी असल्याने आगाऊ नोंदणी टॅटू आर्टीस्टकडे केली जात आहे. मुली फुलपाखरु, एंजल याबरोबर राधा - कृष्णा, बासरी काढून घेत आहेत. मुलांमध्ये नावांचे टॅटू काढण्याची क्रेझ असल्याचे टॅटू आर्टीस्टने सांगितले.
तात्पुरत्या टॅटूमध्ये हल्ली ग्लिटर लावण्याची क्रेझ आहे. ग्लिटरमुळे टॅटू चमकतो आणि उठून दिसतो असे निरीक्षण टॅटू आर्टीस्ट प्रसाद निवाते याने नोंदविले.
नवरात्रीत टॅटू नजरेस पडेल, अशाच भागांवर काढला जातो. पाठ, गळा, दंड या शरीराच्या भागांवर टॅटू काढला जातो. त्यात मनगट ते कोपर या भागांवर टॅटू काढण्याचे प्रमाण अधिक आहे.
नऊ दिवस नऊ प्रकारांचे टॅटू काढण्यालाही तरुणांची पसंती आहे. नऊ रंगांनुसार त्यात्या रंगांचे त्यात्या दिवशी टॅटू काढले जातात.
पावसामुळे टॅटूची क्रेझ कमी झालेली दिसत आहे. पावसामुळे नोकरदार तरुणाईला कायमस्वरुपी टॅटूची काळजी घेणे अशक्य असल्याने इच्छुकांनी तात्पुरत्याच टॅटूला पसंती दिली आहे.
- प्रसाद निवाते
नवरात्रीत देवीचा मंत्रदेखील काढला जातो. सध्या पावसामुळे टॅटू सुकण्यास अडचण होत आहे.
- ओमकार निकार्गे