पावसाने ठाण्यातही अनेक भागांमध्ये पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:25 AM2021-07-19T04:25:18+5:302021-07-19T04:25:18+5:30
ठाणे : शनिवारी रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे मुंबईत जीवितहानी झाली असतानाच ठाण्यातही मोठ्या प्रमाणात पडझड झाली. शहरात तीन ...
ठाणे : शनिवारी रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे मुंबईत जीवितहानी झाली असतानाच ठाण्यातही मोठ्या प्रमाणात पडझड झाली. शहरात तीन ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्या. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही. मात्र, चार रिक्षा आणि तीन मोटारींचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही भागांमध्ये पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या असून, मुंब्य्रात शाळा आणि रुग्णालयातही पाणी भरल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक २१ परिसरात संरक्षक भिंत रविवारी पहाटेच्या सुमारास कोसळली. या ठिकाणी खाली उभ्या केलेल्या चार रिक्षांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर अल्मेडा रोड येथील देबोनेर सोसायटी येथील आणि कळवा पारिसकनगर या ठिकाणीही संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. याठिकाणी उपाययोजना करण्याचे काम पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. दादोजी कोंडदेव क्रीडा संकुल परिसरातही एक मोठे झाड कोसळले. या घटनेत तीन मोटारकारचे नुकसान झाले. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
ठाणे शहरात अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याच्या घटनाही घडल्या. वागळे इस्टेट भटवाडी, किसननगर, कळवा, अंबिका नगर, गावदेवी, उथळसर अशा अनेक भागांमधील सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते.
काही घरांमध्येही शिरले पाणी ...
संभाजीनगरमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे येथील नागरिकांना शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे जागून पाणी काढावे लागले. या परिसरातील हॉटेल रॉयल चॅलेंजच्या पाठीमागे असलेली एक धोकादायक इमारत पाडण्यात आली होती. या इमारतीचा मातीचा ढिगारा तिथेच होता. त्यामुळेच येथील घरांमध्ये पाणी शिरल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.