उल्हास नदीच्या रौद्ररूपाने भरली बदलापूरकरांच्या उरात धडकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 01:11 AM2019-08-05T01:11:10+5:302019-08-05T01:11:20+5:30
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा; नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
बदलापूर : उल्हास नदीला आलेला पूर बदलापूरकरांची चिंता पुन्हा वाढवून गेला आहे. आठ दिवसांनंतर पूरग्रस्त काही प्रमाणात स्थिरावलेले असतानाच शनिवारी रात्रीपासून अनेक सखल भागांत पाणी शिरले. त्यानंतर, रविवारी दुपारीही अनेक भागांत पाणी गेल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पुराचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
२६ आणि २७ जुलैला आलेल्या पुराची पुनरावृत्ती पुन्हा आठ दिवसांनंतर झाली आहे. उल्हास नदीला पुन्हा पूर आल्याने पुरात बाधित झालेल्या कुटुंबीयांनी पुन्हा घर सोडून बाहेर आसरा घेतला आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाहही वाढल्याने नदीकिनारी राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित करण्यात आले. सोनिवली गाव, यादवनगर, हेंद्रेपाडा, वालिवली गाव, रमेशवाडी आदी भागांतील नागरी वस्तीला या पुराचा तडाखा बसला. उल्हास नदीच्या किनाºयावर वसलेल्या या वस्तीमध्ये पाणी भरण्यास सुरुवात होताच सकाळी ८ नंतर सर्वांनी सुरक्षितस्थळी जाणे पसंत केले. अनेक घरांत पाणी शिरल्याने सुरक्षेसाठी नागरिकांनी पहिल्या मजल्यावर आधार घेतला. बदलापूर गावाकडे जाणारा उल्हास नदीवरील पूल भरून वाहत असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अंबरनाथ तालुक्यातील उल्हास नदीच्या किनाºयावर असलेल्या गावांनाही या पुराचा फटका बसला.
बीएसयूपीच्या घरांचा आसरा
उल्हास नदीच्या किनाºयावर असलेल्या यादवनगर भागातील नागरिकांच्या घरात पाणी आल्याने नागरिकांनी आपले घर सोडून शेजारी असलेल्या बीएसयूपी योजनेतील घरांमध्ये आसरा घेतला. या घरांना पालिकेने कुलूप लावले होते. ते कुलूप तोडून नागरिकांनी आसरा घेतला. या पूरग्रस्तांसाठी पालिका आणि स्थानिक नगरसेवकांनी जेवणाची व्यवस्था केली.
सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष
उल्हास नदीच्या प्रवाहात पुलाचा काही भाग वाहून जाण्याची भीती असतानाही या पुलावर पोलिसांची कोणतीच व्यवस्था नव्हती. नागरिकांना आवर घालण्यासाठी पोलिसांची यंत्रणा सज्ज नव्हती. पुराची परिस्थिती भयाण होत असताना सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष होत होते.
नदीचे फोटो काढण्यासाठी गर्दी
उल्हास नदी भरून वाहत असताना या नदीचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी वालिवली गावाच्या पुलावर बघ्यांची गर्दी झाली होती. अनेक जण सेल्फी काढण्यासाठी पुलावर उभे होते, तर काही नागरिक गाडी घेऊन या पुलावर पुराची परिस्थिती पाहत होते. बघ्यांच्या गर्दीत काही महिला आपल्या लहान मुलांनाही घेऊन या पुलावर पाणी पाहत होत्या.
पहिल्या मजल्यापर्यंत पाणी
उल्हास नदीच्या किनाºयावर असलेल्या सर्वच इमारती या पाण्याखाली आलेल्या होत्या. अनेक घरे पाण्याखाली आली होती. नव्या इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेले होते. नदीकिनारी असलेले आश्रम, रिसॉर्ट हेही पाण्यात गेले होते. वालिवलीच्या पुलाशेजारी असलेले मोहन वॉटर एज हा प्रकल्प पूर्ण पाण्याखाली आला होता.
किशोर आरोग्य केंद्राला पाण्याचा वेढा
टोकावडे : किशोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. काही दिवसांपूर्वी किशोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पाण्याखाली गेले होते. शनिवारी रात्रीपासून सतत कोसळणाºया पावसामुळे या आरोग्य केंद्रात पुन्हा पाणी शिरले होते. तसेच कल्याण-माळशेज महामार्गावर पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. बदलापूर डॅम ते मुरबाड हा एकच मार्ग सुरू होता.