पावसाचा एक महिना गेला कोरडाच, २४ टक्के पाऊस कमी
By admin | Published: November 22, 2015 12:58 AM2015-11-22T00:58:56+5:302015-11-22T00:58:56+5:30
यंदा मागील वर्षीच्या तुलनेत २४ टक्के पाऊस कमी झाल्याने ठाण्यासह जिल्ह्यावर भिषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यंदा ठाणे शहरात चार महिने म्हणजेच १२० दिवसांपैकी
ठाणे : यंदा मागील वर्षीच्या तुलनेत २४ टक्के पाऊस कमी झाल्याने ठाण्यासह जिल्ह्यावर भिषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यंदा ठाणे शहरात चार महिने म्हणजेच १२० दिवसांपैकी केवळ ८९ दिवसच पाऊस झाला असून त्यामुळे एक महिना कोरडाच गेला आहे. त्यातही २१ दिवस पावसाने बऱ्यापैकी हजेरी दिली आहे.
मागील तीन वर्षापासून ठाण्यात पावसाचे प्रमाण हे कमी कमी होत जात आहे. २०१३ मध्ये ठाणे ३ हजार ४२७ मिमी पावसाची नोंद झाली होती. २०१४ मध्ये हे प्रमाण २ हजार ६०५ मिमी एवढे झाले. यंदा अर्थात २०१५ मध्ये या प्रमाणात आणखी तफावत झाली असून चार महिन्यात केवळ २ हजार २२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात बरसणाऱ्या वरून राजाने नंतर पाठ फिरवली. १८ जूनला यंदाच्या वर्षीच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून या दिवशी तब्बल १७७ मिमि पाऊस पडला. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी १५९ मिमि पावसाची नोंद झाली होती. जून महिन्यात सात दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस ठाणे शहरात पडून या सात दिवसातच सुमारे ६०० मिमि नोंद झाली आहे. तर जुलै महिन्यात ६९५ मिमि पावसाची नोंद झाली आहे. या महिन्यात २० तारखेला ११३ मिमि आणि २१ तारखेला ९८ मिमि पावसाची नोंद झाली आहे. या महिन्यात केवळ आठ दिवसच चांगला पाऊस पडला होता.
आॅगस्ट महिन्यात हे प्रमाण अर्ध्यावर आले. या महिन्यात केवळ ३३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या २५ तारखेला ८१ मिमी पाऊस पडला होता. तत्पूर्वी १७ तारखेला ४५ मिमी पावसाची नोंद झाली. तर इतर दिवशी अत्यंत कमी पाऊस पडला आहे.
सप्टेंबर महिन्यात पावसाच प्रमाण कमी होवून या महिन्यात केवळ २४८ मिमी पाऊस पडला आहे. २१ तारखेला ७२ मिमी आणि १८, १९ आणि २० तारखेला थोड्याफार प्रमाणात पाऊस पडला. त्याव्यतिरिक्त अन्य दिवशी अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे. तर आॅक्टोबर हीट असतांनाही या महिन्यात २ दिवस ठाणे शहरात पाऊस पडला त्यातही केवळ ३ तारखेला ६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मागील तीन वर्षाच ठाणे शहारत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण लक्षात घेता, ते सरासरी कमी होत गेले आहे यंदा कमी पडलेल्या पावसाने ठाणेकरावर पाणी कपातीच संकट ओढावले आहे. आतापासूनच महापालिकेने रोज १५ टक्के पाणी कपात केली आहे. त्याशिवाय दर बुधवारी आणि शुक्र वारी शहरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येत आहे. सध्याचा पाणी साठा लक्षात घेता येत्या काही महिन्यात ठाणेकर नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.