न्यूमोनिया लसीबाबतची जनजागृती संपूर्ण शहरात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:44 AM2021-07-14T04:44:24+5:302021-07-14T04:44:24+5:30

न्यूमोमोकल कॉन्झुगेट व्हॅक्सीनचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : न्यूमोनिया या आजारापासून लहान बालकांची सुरक्षा करण्याकरिता ...

Raise awareness about the pneumonia vaccine throughout the city | न्यूमोनिया लसीबाबतची जनजागृती संपूर्ण शहरात करा

न्यूमोनिया लसीबाबतची जनजागृती संपूर्ण शहरात करा

Next

न्यूमोमोकल कॉन्झुगेट व्हॅक्सीनचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : न्यूमोनिया या आजारापासून लहान बालकांची सुरक्षा करण्याकरिता न्यूमोमोकल कॉन्झुगेट व्हॅक्सिनचा शुभारंभ सोमवारी सर्वत्र करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रातही ही लस उपलब्ध करण्यात आली असून, तिचे उद्घाटन महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाले. न्यूमोनियापासून होणारे बालकांचे मृत्यू रोखण्याकरिता ही लस अत्यंत उपयोगी असून, ती सर्व बालकांना देण्याची जनजागृती संपूर्ण ठाणे शहरात करावी, अशा सूचना महापौरांनी यावेळी संबंधित विभागाला केली.

न्यूमोनिया हा फुप्फुसांना होणारा संसर्ग असून, त्यामुळे बालकांना श्वासोच्छ‌्वासाला त्रास होणे, धाप लागणे, ताप व खोकला येणे अशी लक्षणे दिसून येतात. जर हा आजार गंभीर स्वरूपाचा असेल तर मृत्यूदेखील ओढवतो. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात मृत्यूचे प्रमाण फार कमी होते. परंतु, या आजारापासून लहान बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी नियमित लसीकरणांतर्गत न्यूमोनियाचे लसीकरण करणेदेखील गरजेचे आहे. एक वर्षाच्या आतील बालकांना म्हणजेच जन्मल्यापासून सहा आठवड्यांनी पहिला डोस, १४ आठवड्यांनी दुसरा डोस व नऊ महिन्यांनंतर तिसरा डोस दिला जाणार आहे. न्यूमोकोकल कॉन्झुगेट व्हॅक्सिन (pcv) हे महानगरपालिकेच्या सर्व आरोग्यकेंद्रात विनामूल्य दिली जाणार आहे, तर खासगी रुग्णालयांमध्ये या लसीची किंमत चार हजार रुपये इतकी आहे. ठाणे शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या एक वर्षापर्यंतच्या बालकांना हा डोस द्यावा, असे आवाहन म्हस्के यांनी केले.

यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते शानू पठाण, आरोग्य समिती सभापती निशा पाटील, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेवक विकास रेपाळे, सुनेश जोशी, उपायुक्त अश्विनी वाघमळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी वैजयंती देवगीकर, डॉ. खुशबू टावरी, डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Raise awareness about the pneumonia vaccine throughout the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.