नव्या पिढीला राज कपूर यांनी स्वप्ने दाखविली: अशोक हांडे
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: February 10, 2025 15:45 IST2025-02-10T15:43:06+5:302025-02-10T15:45:32+5:30
सुयश कला-क्रीडा मंडळाच्यावतीने श्री सिद्धिविनायक मंदिर व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प हांडे यांनी `राज कपूर यांची जन्मशताब्दी ' या विषयावर गुंफले.

नव्या पिढीला राज कपूर यांनी स्वप्ने दाखविली: अशोक हांडे
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : स्वातंत्र्यानंतर नव्या पिढीला राज कपूर यांनी स्वप्ने दाखविली. रशियात मार्क्स-लेनिन अस्तंगत झाले. पण आजही राज कपूर यांची आठवण काढली जाते. ते कायम सामान्यांमध्ये रमले. इतकेच नव्हे तर सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कारही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना अर्पण केला, अशी माहिती प्रसिद्ध गायक व निर्माते अशोक हांडे यांनी दिली. राज कपूर आपल्या आयुष्यात आले, हे भाग्य आहे. आता त्यत्चीचा चित्रपट गीते व चित्रपटाचा ठेवा हा पुढील पिढीला पोचविणे, ही आपली त्यांच्याप्रती कृतज्ञता राहील,त्शा भावना हांडे यांनी व्यक्त केल्या.
सुयश कला-क्रीडा मंडळाच्यावतीने श्री सिद्धिविनायक मंदिर व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प हांडे यांनी `राज कपूर यांची जन्मशताब्दी ' या विषयावर गुंफले. यावेळी व्यासपीठावर गायक संकेत जाधव यांच्या सोबतीने हांडे यांनी रसिकांना राज कपूर यांच्या चित्रपटातील विविध गीते गात व आठवणी सांगत मंत्रमुग्ध केले. प्रसंगी १० वर्षांच्या ग्रिहिथा विचारे हिचा हांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चित्रपटाच्या माध्यमातून परदेशात भारतीय संस्कृती व भारतीय विचारधारा पोचविणारे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक राज कपूर हे भारताचे पहिले सांस्कृतिक राजदूत आहेत, असे मत हांडे यांनी पुढे बोलताना व्यक्त केले. भारतीय चित्रपटावर अविस्मरणीय ठसा उमटविलेल्या राज कपूर यांनी भारतातील रसिकांना मानवतेचा संदेश देण्याबरोबरच प्रेम करायलाही शिकविले. तर संघर्ष करीत असतानाच संघर्षावर हसत मात करण्यासाठी प्रेरणा दिली, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आपल्या प्रत्येक चित्रपटातून राज कपूर यांनी सामाजिक संदेश व सामान्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील अनुभवांचे चित्रण दाखविले. १९७० च्या दशकात भारतीय चित्रपटांची अभिरुची बदलल्याचे लक्षात आल्यावर बॉबी, सत्यम शिवम सुंदरम, राम तेरी गंगा मैली असे चित्रपट तयार केले. प्रत्येक चित्रपट व गीतामध्ये राज कपूर यांनी मेहनत घेतली. `मेरा नाम जोकर' चित्रपट तयार करताना भव्यतेची आस धरली. परंतू, तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी आपटला. भविष्यात या चित्रपटातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न कपूर कुटुंबियांना मिळाले, अशी माहिती हांडे यांनी दिली.